घरमहाराष्ट्रनाशिक'रेड अलर्ट'चा फुसका बार

‘रेड अलर्ट’चा फुसका बार

Subscribe

नाशिक : सलग चार दिवसांच्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला असताना हवामान विभागाने मंगळवार (दि.12) पासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, हा इशारा मिळाल्याच्या पहिल्याच दिवशी (दि.१२) पावसाने उघडीप दिली. हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’ फुसका बार ठरल्याने त्याची सर्वत्र खिल्ली उडवली जात आहे.

राज्यात सर्वदूर पाऊसधारा कोसळत असल्याने बहुतांश धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे आता यापुढे पाऊस पडत राहिला तर नद्यांना महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच हवामान विभागाने सोमवारी सतर्कतेचा इशारा देत गुरुवार (दि.14) पर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गंगापूर धरणातून 10 हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. परिणामी, गोदावरीला पूर आला. दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. आता मारुती बुडण्याच्या अवस्थेत असताना पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरीला आलेला पूर मंगळवारी बर्‍याच प्रमाणात कमी झाला. दिवसभर पाऊस न पडल्यामुळे ‘रेड अलर्ट’ घोषित करणार्‍या हवामान विभागाविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे विनोद सुरू झाले. ‘हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करताच पावसाची माघार’, ‘ पावसाला थांबवण्यासाठी शेवटी ‘रेड अलर्ट’ची घोषणा करावी लागली’, ‘पावसालाही रेड अलर्ट कळतो म्हणून तो आज वेळीच थांबला’ अशा स्वरुपाचे मेसेज सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत होते. या संदेशांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिक्रियांवरुन दिसून आले.

- Advertisement -

शहरासाठी रेड अलर्ट नाही ः हवामान विभाग रेड अलर्ट जाहीर करताना डोंगराळ भागाचा प्रामुख्याने विचार करते. डोंगराळ भागात अतिवृष्टी झाल्यास त्याखाली असलेल्या गावांना हा सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिणामी, पाऊस पडल्यानंतर नद्यांना महापूर येऊ शकतो आणि नदीकाठच्या गावांना त्याचा फटका बसण्याची शक्यता गृहित धरुन हवामान विभाग हा जिल्ह्यातील डोंगराळ भागासाठी रेड अलर्ट जारी केल्याची माहिती प्रशासन अधिकार्‍यांनी दिली. परंतु, सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर त्याचा अर्थ सर्वसाधारणपणे शहरासाठी असा गृहित धरला जातो, तो चुकीचा आहे. त्याचा पावसाशी तसा प्रत्यक्ष संबंध नसतो, असा खुलासाही त्यांनी केला.

हवामान विभाग झोपला होता का ?

शहरासाठी रेड अलर्ट नाही असा खुलासा करणार्‍या हवामान विभागाचे अधिकारी महापालिकेच्या आवाहननंतरही तोंडावर बोट ठेऊन होते यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने आपल्या कर्मचार्‍यांना सतर्कतेचा इशारा दिला. शिवाय नागरिकांसाठीही आपत्कालीन कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर केले. इतकेच नाही तर पहिली ते १२ वी पर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर केली. तरीही हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी रेड अलर्टबाबत खुलासा केला नाही. त्यामुळे रेड अलर्टबाबत महापालिका प्रशासनान अनभिज्ञ होते की हवामान विभागाचे अधिकारी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -