शहरात १६ वर्षीय युवतीसह चौघांची आत्महत्या

नाशिकरोड, उपनगर, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या घटना

नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चार जणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर उर्वरीतांनी गळफास लावून आत्महत्या केल्या असून त्यात एका १६ वर्षीय युवतीचा समावेश आहे. या घटना नाशिकरोड, उपनगर, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.

सामनगाव रोडवरील अरिंगळे मळ्यात राहणाऱ्या अश्विनी राजेंद्र गोपाल (१६) या युवतीने शनिवारी (दि.७) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच काका महेंद्र गोपाल यांनी तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ.डी.के.पाटील यांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक घेगडमल करीत आहेत.

दुसरी घटना वडनेर दुमाला शिवारात घडली. अंबादास कचरू मांडे (५१) यांनी रविवारी (दि.८) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या अल्टो कारमध्ये विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांना बिटको रूग्णालयात मार्फत अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पवार यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक होलगीर करीत आहेत.

अंबड पोलीस ठाणे हद्दीत, महेश नाथोबा भोसले (४६) यांनी रविवारी (दि.८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकनाथ दळवी यांनी खबर दिली असून चौथी घटना याच भागातील खुटवडनगर भागात घडली.

ओमप्रकाश विजयबहादुर सिंग यांनी रविवारी (दि.८) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनोज विश्वकर्मा यांनी खबर दिली. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक संगम व हवालदार राऊत करीत आहेत.