सिन्नरच्या प्रकल्पासाठी नाशिकच्या औष्णिक केंद्राचा बळी देऊ नका; ग्रामस्थांची मागणी

शासन स्तरावर सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्पासाठी हालचाली वेगात सुरू

नाशिक : औष्णिक वीज केंद्रात आज सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असतांना ही नाशिककडे कानाडोळा केला जातोय. तर खासगी रतन इंडियासाठी पायघड्या घातल्या जाताय हे कितपत योग्य आहे. जर रतन इंडियाची वीज एमओडीत बसणार आहे तर नाशिक औष्णिकला नवीन प्रकल्प बनविला तर येथील दरात कमी नाही येणार का, की ही बाब हेतुपुरस्सर दुर्लक्षित केली जात आहे. आज वर जेव्हाही महानिर्मितीवर वीजेचे संकट आले आहे तेव्हा नाशिक केंद्राने आपली भूमिका पार पाडली आहे, असे असताना नाशिक औष्णिक वीज केंद्र दुर्लक्षित का हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

शासन स्तरावर सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्पासाठी हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात एनटीपीसीच्या समितीनेही पाहणी केली आहे. येथील संच जरूर सुरू व्हावेत पण नाशिक औष्णिक वीज केंद्राचा बळी मात्र दिला जाऊ नये अशी पंचक्रोशीतील नागरिकांची भावना आहे.

सिन्नर (गुळवंच) येथील रतन इंडियाचे संच बनले तेव्हापासून ते बंदच आहेत. हे संच कार्यान्वित झाले नाही. त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी जो खर्च येणार आहे त्या किंमतीत एकलहरे येथे नवा संच उभारला जाईल असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकल्पासाठी ज्या बँकेचे कर्ज घेतले गेले त्याचे व्याज मुद्दलच्या दुप्पटीत गेले असून याचा भार जनतेने का सोसावा असे मत नागरिकांचे आहे.