घरमहाराष्ट्रनाशिकदिवाळी ऑफर्सच्या फसव्या मेसेजने मोबाईलधारकांचा खिसा रिकामा

दिवाळी ऑफर्सच्या फसव्या मेसेजने मोबाईलधारकांचा खिसा रिकामा

Subscribe

ई-केवायसी, लकी ड्रॉ पाठोपाठ आता ऑफर्सचे आमीष; फसवणुकीसाठी एसएमएससह फेसबूकचा वापर

नाशिकः ई-केवायसी, लकी ड्रॉ, लॉटरी, सीमकार्ड तर कधी बँकेच्या नावाने मेसेज आणि कॉल करणार्‍या भामट्यांनी आता पार्श्वभूमीवर दिवाळी ऑफर्सच्या नावाने फसवणुकीचा फेस्टिवल सुरू केलाय. त्यामुळे आता अशा फसव्या मेसेज, कॉल्स किंवा लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी नागरिकांना चार वेळा विचार करावा लागणार आहे.

केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जे प्रयत्न सुरू केलेत, त्या तुलनेत हे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक सुरक्षितता आणि त्याच्या प्रबोधनासाठी प्रभावी प्रयत्न होत नाहीत. नेमक्या याच कारणामुळे आजही ज्येष्ठांसह तरुणाईदेखील अगदी सहजपणे सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडते आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, बहुतांश घटनांमध्ये बदनामीच्या भीतीने नागरिक पोलिसांत जात नाहीत. त्यातून चोरट्यांची हिंमत वाढते. लिंक पाठवताना अनेकदा आपल्याला दिसताना Amaz0n शब्द दिसतो. मात्र, या नावात ओऐवजी शून्याचा वापर केलेला असतो. त्यातून मोठी फसगत होते. या वेबसाईट्स डॉट कॉमऐवजी एक्स वाय झेडसारख्या असतात. मोबाईलवर आलेली एखादी लिंक कम्प्युटरवर ओपन करुन खात्री केल्यास आर्थिक फसवणुकीची शक्यता कमी होतील. कारण, मोबाईलमध्ये लिंक ओपन केल्यास ती रिडायरेक्ट त्यातील गूगल पे किंवा फोन पेच्या माध्यमातून व्यवहारांपर्यंत पोहोचते. हे टाळण्यासाठी सतर्क राहतानाच मोबाईल ग्राहकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

अशी टाळा फसवणूक

  •  सीमकार्ड, बँक, विमा पॉलिसी अशा कोणत्याही फोन कॉल्स किंवा मेसेजला माहिती देण्यापूर्वी थेट संबंधित संस्थेच्या कार्यालयात जा.
  • प्रत्येक कंपनीची स्वतःची वेबसाईट असते. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी किंवा केल्यावर तशी खात्री करा. शंका आल्यास त्यातून बाहेर पडा.
  • अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या नावाने मेसेज आले असल्यास ऑफर्ससाठी लिंकऐवजी थेट त्या अ‍ॅप्सवर जा.
  • अनोळखी लिंकद्वारे पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक अशी माहिती देऊ नका.

जगात मोफत काही मिळत नाही, एवढे लक्षात ठेवले तरीही फसवणुकीचे प्रमाण कमी होईल. फसवणूक करणारे खूप हुशार असतात. ते नेहमी वेगवेगळी कारणे आणि निमित्त शोधून नव्या मार्गाने आर्थिक फसवणूक करत असतात. फसवणूक टाळण्यासाठी आपण सावध राहणे, हाच एकमेव उपाय आहे.
                                         – तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

- Advertisement -

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -