घरमहाराष्ट्रनाशिक‘आजी’चे बळ अन् बिबट्याचा पळ

‘आजी’चे बळ अन् बिबट्याचा पळ

Subscribe

सहा वर्षीय रोशन शर्थीच्या झुंजीनंतर बचावला

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडीनजिकच्या कळमुस्ते पाड्यावर मंगळवारी (दि.८) सायंकाळी आजी चुलीवर स्वयंपाक करीत होती. त्यावेळी तिचा नातू सहावर्षीय रोशन बुधा खडम आणि त्याच्या मागे बिबट्या घरात घुसला. क्षणार्धातच बिबट्याने जोरकस डरकाळी फोडत आजीसमोरच रोशनला मानेला धरुन जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. पण, बहाद्दर आजीने रोशनला वाचवण्यासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आजी आणि पाड्यावरच्या ग्रामस्थांनी हातात दिवे धरुन जंगलाकडे धाव घेतली. माणसांची धावपळ आणि दिवे बघून भेदलेल्या बिबट्याने दीडशे मीटर अंतरावरच रोशनला टाकून पळ काढला. ग्रामस्थांनी पटकन जखमी अवस्थेतील रोशनला घेत जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्याच्यावर बुधवारी (दि.९) जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी नजिकच्या कळमुस्ते पाड्यावर खडम कुटुंबीय राहतात. रोशनचे आईवडिल मोलमजुरी करीत असून, ते कामानिमित्त दोन महिन्यांपासून पुण्यात आहेत. रोशन आणि त्याचा मोठा भाऊ आजीसोबत राहतो. मंगळवारी (दि.८) सायंकाळी सात वाजेदरम्यान आजी घरात जेवण तयार करीत होती. त्यावेळी रोशन घरात आला. तितक्यात बिबट्यासुद्धा घरात आला. बिबट्याने आजीसमोरच रोशनच्या दिशेने मोर्चा वळवला. बिबट्याने क्षणार्धात रोशनची मान तोंडात धरून जंगलाच्या दिशेने पळ काढला.

- Advertisement -

आजीने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धावली. ही बाब ग्रामस्थांना समजताच त्यांनीसुद्धा जंगलाकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि दिवे दिसताच भेदरलेल्या बिबट्याने रोशनला जमिनीवरच टाकून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात रोशनच्या गळ्याला, छातीला आणि हाताला खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याला उपचारार्थ बुधवारी (दि.९) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कळमुस्ते पाड्यावर पिंजरे लावण्याची तयारी वन विभागाने केली आहे. शिवाय, रोशनच्या नातेवाइकांना वनविभागातर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -