घरमहाराष्ट्रनाशिकविडी कामगार आजींचा नातू बनला शासकीय अधिकारी

विडी कामगार आजींचा नातू बनला शासकीय अधिकारी

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

संगमनेर :  शिक्षण हा तिसरा डोळा ,असे आपण म्हणतो. त्याचा प्रत्यय येथील इंदिरानगरमध्ये राहणार्‍या एरंडे कुटुंबात आला असून, विडी कामगार म्हणून काम करणार्‍या इंदुबाई एरंडे यांचा नातू इंजि. तुषार उत्तम एरंडे यांची महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन कणकवली येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून रुजू झाला आहे.

दिवंगत गणपत एरंडे व इंदुबाई एरंडे हे संगमनेरच्या भिकुसा यमासा क्षत्रिय विडी कारखान्यात विड्या वळण्याचे काम करायचे. त्यांना रवींद्र, उत्तम व सुदाम ही तीन मुले आहेत. मुले लहान असतानाच वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजे १९७३ मध्ये गणपत एरंडे यांचे निधन झाले. मात्र, इंदुबाई एरंडे डगमगल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर त्यांनी विड्या बांधून आपल्या तीनही मुलांना शिक्षण दिले. मुलांनीही मिळेल ती कामे करुन शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा रवींद्र बारावीनंतर नाशिकला मामाकडे गेला. तिथे व्हीआयपी इन्डस्ट्रीजमध्ये नोकरीला लागला. तो नोकरी सांभाळून मास्टर इन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नलिझम ही पदवी प्राप्त केली. त्यांनी पत्रकार म्हणून नावलौकीक मिळविला. तर सामाजिक कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, नाशिक महापालिकेचा लोककल्याण पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त केले. दुसरा मुलगा उत्तम यांनी एम.ए. बी.एड. ही पदवी संपादन केली. ते संगमनेरच्या मालपाणी विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.

- Advertisement -

तिसरा मुलगा सुदाम यांनी डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन ही पदवी संपादन केली. त्यांनी संगमनेरला त्रिमूर्ती बुकसेलर्स नावाने व्यवसायात जम बसविला. इंदुबाई एरंडे यांचे द्वितीय चिरंजीव शिक्षक उत्तम एरंडे यांचा मुलगा तुषार याला लहानपणापासूनच अभ्यास आणि खेळाची आवड होती. मालपाणी विद्यालयात तुषारचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याचवेळी हँडबॉल या क्रीडाप्रकारात त्याने नाव कमावले. बारावीनंतर कोपरगावला इंजिनिअरिंग शिक्षणासाठी गेला. तिथे तुषारने बी.ई (सिव्हील) ही पदवी संपादन केली. त्यावेळी हँडबॉल या खेळात राष्ट्रीय स्पर्धांमध्येही यश मिळविले. बी.ई.पदवीनंतर तुषार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्याला गेला. खुल्या प्रवर्गातून केवळ अभ्यासाच्या बळावर तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला.

मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तुषार एरंडे यास नियुक्तीपत्र देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून तुषारची कणकवली कार्यालयात नियुक्ती झाली. यामागे त्याची आजी इंदुबाई एरंडे यांची प्रेरणा आहे. स्वतः अशिक्षित असली तरी विड्या बांधून या माऊलीने मुलांना उच्चशिक्षण दिले. मुले तर उच्चशिक्षित आहेतच शिवाय त्यांची दोन नातवंडे एम.बी. ए. तर तीन नातवंडे इंजिनिअरिंग पदवी प्राप्त आहेत. त्यांचा नातू तुषार हा एरंडे कुटुंबातील पहिला शासकीय अधिकारी झाला आहे. प्राप्त परिस्थितीला जिद्दीने सामोरे जात जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि निश्चित ध्येय समोर असले की हमखास यश मिळते. याचे आदर्श उदाहरण म्हणजे तुषारचे यश होय. त्यामुळेच विडी कामगार आजींचा नातू महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाला आहे. सामान्य कुटुंबांना लढण्याचे बळ देणारी ही यशकथा आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -