नाशकात कोरोनाने पुन्हा काढलेे डोके वर; महापालिका प्रशासन सतर्क

नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कोविड टास्क फोर्सची बैठक बोलवत,राज्यात करोनाबाबत अलर्ट जारी केला आहे. नाशिक शहरातही शुन्यावर आलेली करोना रुग्णसंख्या हळू हळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे महापालिका देखील सतर्क झाली असून करोनाच्या या संभाव्य चौथ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा धोका असल्याने उर्वरीत नागरिकांचे लसीकरण करण्यासह नव्याने करोना चाचण्यांची संख्या पाचशे पर्यंत वाढविण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. यासोबतच ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला आहे. सर्दी, खोकला, तापाच्या संशयीत रुग्णांची चाचणी करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

कोरोनामुळे नाशिक शहरात आतापर्यंत तीनही लाटेत २ लाख ७२ हजार ७९७ जणांना करोनाची लागण झाली आहे. ४ हजार १०५ जणांनी आपला जीव गमावला आहे. युरोपियन देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. दिल्ली पाठोपाठ आता राज्यातही रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच पुण्यात करोनाचा बी-५ हा नवीन व्हेरीयंट आढळला असून मुंबईतही रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. पाठोपाठ गेल्या दोन तीन दिवसात नाशिक शहरातील रुग्णसंख्येतही वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

शुन्यावर आलेली रुग्णसंख्या आता चार ते पाच ने वाढू लागल्याने राज्यसरकारच्या आदेशानंतर महापालिका यंत्रणाही अलर्ट झाली आहे. शहरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता,वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यासह संशयित कोरोना रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी दिले आहेत. सध्या दिवसाला दिडशे ते दोनशे पर्यंत करोना चाचण्या केल्या जात असून, या चाचण्या पाचशे ते सहाशे पर्यंत वाढविल्या जाणार आहेत. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय , बिटको रुग्णालयासह ३० शहरी आरोग्य केंद्रामध्ये करोना चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे. तसेच सर्दी,खोकला,तापाच्या संशयीत रुग्णांची चाचणी करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. तसेच रुग्णसंख्या अधिक वाढल्यास राज्यशासनाच्या सूचनेनुसार शहरात मास्कची सक्ती करण्याचा देखील विचार महापालिकेकडून सुरू करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.