अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची चौकशी

नितेश राणेंकडून पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस नाईक प्रशांत नागरेंच्या तक्रारींचा पाढा

नाशिक :  अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात बुधवारी (दि. २८) लक्षवेधी मांडत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या निलंबनाची मागणी केली. यासंदर्भात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध ऑईलचे धंदे, स्टीलचे धंदे, देशी दारूचे धंदे, मटका, जुगार, सोरट या प्रकारचे धंदे, वाहनांमध्ये घरगुती गॅस भरायचे धंदे, गुटखा विक्री अशाप्रकारचे धंदे जोरात सुरू आहेत. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील भंगार बाजार, अवैध धंदे आणि त्यातून पोलिसांना मिळणारा मलिदा यामुळे या पोलीस स्टेशनचे अधिकारी नेहमी चर्चेत राहिले आहेत. यापूर्वीच्या अनेक अधिकार्‍यांनी सुधारणा करत गुन्हेगारीमुक्त पोलीस ठाणे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर या ठिकाणी एक वर्षापूर्वी सूत्रे हाती घेतलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. सिडकोतील प्रत्येक भागात मटका, जुगार, देशी दारू इतरही प्रकारचे धंदे सुरू आहेत. त्यातून पोलीस अधिकार्‍यांनी मलिदा जमा करायला सुरुवात केली आहे. त्यातील साखळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांपर्यंत गुंतली असल्याचाही आरोप केला जात आहे.

गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. स्थानिक आमदारांनाही याबाबत गांभीर्य नसल्याने याची दखल थेट नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन आमदार नितेश राणे यांनी घेतली. लक्षवेधी मांडत अंबड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व पोलीस नाईक प्रशांत नागरे यांच्याबाबत सगळा इतिहास मांडला. त्यानंतर राणे यांनी त्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट एडीजी लेव्हलच्या आधिकार्‍यांमार्फत चौकशीचे आदेश दिले.