घरमहाराष्ट्रनाशिक"कळवण-सुरगाण्याला निधी कमी पडू देणार नाही" अजित पवारांची कळवण येथील मेळाव्यात ग्वाही

“कळवण-सुरगाण्याला निधी कमी पडू देणार नाही” अजित पवारांची कळवण येथील मेळाव्यात ग्वाही

Subscribe

१८३ कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

कळवण : मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय ए. टी. पवारांनी सर्वस्व पणाला लावून लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श राज्यात निर्माण केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आमदार नितीन पवार हे मतदारसंघातल्या विकासकामांसाठी सातत्याने धडपड करून शासन दरबारी पाठपुरावा करत असून पवार म्हणजे आमची भावकी असल्याने कळवण-सुरगाणा मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कळवण तालुक्यातील नाकोडे येथे आयोजित कळवण – सुरगाणा मतदारसंघातील १८३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित भव्य शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व युवक मेळाव्यात पवार बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, माजी आमदार जयंत जाधव, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, श्रीराम शेटे, रंजन ठाकरे, यतीन पाटील, अमृता पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, नाना महाले, पुरुषोत्तम कडलग, चिंतामण गावित, सुमित्रा बहिरम, मनीषा पवार, नारायण हिरे, राजेंद्र भामरे, हेमंत पाटील, संतोष देशमुख, राजू पवार, संदीप वाघ उपस्थित होते.

- Advertisement -

पवार पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आरोग्य सुविधांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाला साडेसात हजार कोटी रुपये निधी दिला आहे. कळवण – सुरगाणा मतदारसंघात आमदार नितीन पवार यांनी मागणी केलेल्या आरोग्य, सिंचन, रस्ते या सर्वच कामांसाठी मी स्वतः लक्ष देऊन कामे करून देणार असून तुम्ही नितीन पवारांवर विश्वास टाकला आहे आता हा विश्वास सार्थ ठरवायची जबाबदारी आमची असून कळवण-सुरगाणा मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही. महिलांना आर्थिक सक्षम करणे व निर्णयप्रक्रियेत स्थान देणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला असून आदिवासी व ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ना. पवार यांनी सांगितले. प्रास्ताविकात आमदार नितीन पवार यांनी कळवण-सुरगाणा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, चिंतामण गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या गीतांजली पवार, यशवंत गवळी, रवींद्र देवरे, मविप्र संचालक अशोक पवार, देविदास पवार, शरद गुंजाळ, भूषण पगार, ऋषिकेश पवार, सुवर्णा गांगोडे, सपना पगार, अलका कनोज, संदीप पगार, रामा पाटील, सागर खैरनार, जगदीश पवार, योगेश आहेर, विलास रौंदळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

एटींची आठवण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात माजीमंत्री स्व. ए. टी. पवार यांची आठवण काढत त्यांच्या सोबतच्या असंख्य स्मृतींना उजाळा दिला. विनयशीलता हा ए. टी. पवार यांच्यामधला महत्वाचा गुण होता. हात जोडून काम करून घेण्याची हातोटी त्यांच्यात होती. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावून शाश्वत विकासाचा प्रामाणिक प्रयत्न केला. विकासाचा ए. टी. पॅटर्न राज्यात आदर्श ठरला असून, एटींचा वारसा पुढे चालवताना नितीन हे काम चांगल्या पद्धतीने पार पाडतील, हा विश्वास आपल्याला असून तुमच्यासाठी तो धावतोय, पळतोय त्याची साथ सोडू नका, असे आवाहन पवार यांनी जनतेला केले.

आदिवासी नृत्याने वेधले लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सभास्थळी आगमन होताच आदिवासी कलाकारांनी आदिवासी कला नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पवारांनी या नृत्याचा आपल्या भाषणात उल्लेख करून कलाकारांचे कौतुक केले.

पवार माझे नेते त्यामुळे त्यांचे विशेष प्रेम प्रास्ताविकात आमदार नितीन पवार यांनी अजित पवार यांच्याशी असलेली निष्ठा आणि त्यांच्याप्रती असलेली भावना बोलून दाखवली. आपण दिल्ली रिटर्न आमदार असून अजित पवार हे आपले नेते असल्याने विकासासाठी कधीही निधी कमी पडत नाही. मतदारसंघाच्या विकासकामांना दादा कधीच नाही म्हणत नाहीत त्यामुळे दादांचे आपल्यावर व कळवण – सुरगाणा मतदारसंघावर विशेष प्रेम असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.

सप्तशृंग गड-अलियाबाद रस्त्यासाठी २९१ कोटी मंजूर करणार

आमदार नितीन पवार यांनी प्रस्तावित केलेल्या सप्तशृंग गड – नांदुरी- अभोणा – कनाशी – आलियाबाद रस्त्यासाठी येत्या काळात २९१ कोटी रुपये निधी मंजूर करणार असून सुरगाणा उपजिल्हा रुग्णालय, सप्तशृंग गडासाठी भरघोस निधी तसेच विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -