किकवी प्रकल्प लागणार मार्गी; अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद

नाशिक : तब्बल १२ वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी किकवी प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याचे संकेत आहेत. या प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात ५० कोटी निधीची तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाचे राज्याचे सेक्रेटरी दीपक कपूर यांना दिल्या आहे. मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे किकवी धरणाचे काम आता प्रत्यक्ष सुरु होणार असल्याने नाशिककरांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मिटणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. गंगापूर धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुमारे ६ टीएमसी इतकी आहे. शहराची व्याप्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे तत्कालीन सरकारने सन २०१० मध्ये किकवी धरण प्रस्तावित केले आहे. या धरणाच्या कामासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या, मान्यता यापूर्वीच जलसंपदा विभागाला मिळाल्या आहेत. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने या धरणाचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरु झालेले नाही. परिणामी धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्याकामी पुढाकार घेत जलसंधारण विभाग तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे सततचा पाठपुरावा करत किकवी धरणासाठी येत्या बजेटमध्ये किमान ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यानूसार मागील आठवड्यात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिवांना किकवी धरणाविषयीचा सविस्तर अहवाल पाठवत येत्या २०२२-२३ च्या आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्याची मागणीचे पत्र पाठविले आहे.

खासदार गोडसे यांनी मंगळवारी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मंत्रालयातील बैठकीत किकवी धरणाचा मुद्दा उपस्थित केला. किकवी धरणासाठी येत्या बजेटमध्ये ५० कोटींच्या निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी केली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाचे राज्याचे सेक्रेटरी दीपक कपूर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. प्रस्तावित किकवी धरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, धरणाच्या बांधकामासाठी येत्या बजेटमध्ये ५० कोटींच्या निधीची तरतूद करा अशा सूचना वजा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी कपूर यांना दिला. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.

अनेक दशकांसाठी पाण्याचा प्रश्न मिटणार

सध्या नाशिक शहराला गंगापूर, मुकणे, वैतरणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या चार वर्षांत शहराची पाण्याची गरज 600 एमसीएफटीने वाढली आहे. ती 4.9 टीएमसी वरून 5.6 टीएमसी एवढी झाली आहे. यासाठी गंगापूर धरणातून 4 टीएमसी, मुकणे धरणातून 1.5 टीएमसी आणि दारणा धरणातून 0.1 टीएमसी इतका विसर्ग होतो. मात्र गंगापूर धरणाची 7.2 टीएमसी इतकी क्षमता असताना गेल्या काही वर्षांमध्ये गाळ साठल्याने 1.8 टीएमसीने कमी झाली आहे. शहराच्या लोकसंख्येत होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेता गंगापूर, मुकणे, वैतरणा धरणातून होणारा पाणीपुरवठा भविष्यात कमी पडणार आहे. त्यामुळे गंगापूरची कमी झालेली साठवण क्षमतेचा विचार करता पाणीसाठा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने गंगापूर धरणाच्या उर्ध्व बाजुला किकवी नदीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात बेझे गावाच्या परिसरात किकवी धरण झाल्यास नाशिकचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.