घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबिबट्या कातडी तस्करी प्रकरण; आता हाडे, मांस, दातांचा शोध सुरु

बिबट्या कातडी तस्करी प्रकरण; आता हाडे, मांस, दातांचा शोध सुरु

Subscribe

नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीचा वन विभागाने पर्दाफाश केला असला तरी तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. तस्करीसाठी बिबट्याला तस्करांनी पाच महिन्यांपूर्वी ठार केले असावे, असे सुत्रांनी सांगितले. तस्कारांनी बिबट्याची हाडे, मांस व दातांचे काय केले, याचा शोध वन विभाग घेत आहे. चार तस्कारांना मंगळवारी (दि.६) न्यायालयाने सात दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

बिबटया वन्यप्राण्याच्या कातडी विक्रीसाठी मौजे अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे चार तस्कर बिबट्याची कातडी घेऊन आले होते. नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सोमवारी (दि.५) कारवाई करत चार तस्करांना अटक केली. त्या कारवाईत वन विभागाच्या कर्मचारी व तस्करांमध्ये झटापट झाली. यावेळी वन अधिकार्‍यांनी हवेत गोळीबार केला होता. प्रकाश लक्ष्मण राऊत (वय ४३, रा. रांजणपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर), परशुराम महादु चौधरी (३०, रा. चिंचुतारा, ता. मोखाडा, जि. पालघर), यशवंत हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर), हेतु हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, वन अधिकारी, कर्मचारी व तस्करांमध्ये झटापट झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार केला.

- Advertisement -

या कारवाईत वन कर्मचार्‍यांनी बिबट प्राण्याची कातडी व दोन दुचाकी वाहन ताब्यात घेतल्या. बिबट्याची कातडी प्रादेशिक न्यायवैधक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. त्यावर नर की मादी व किती वर्षांची आहे, ते समजणार आहे. या रॅकेटमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यातील तस्कर असावेत, असा संशय आहे. यासह तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असावे अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आरोपींना ३ ते ७ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा होते. नागरिकांनी अंधश्रद्धा व आमिषांना बळी पडू नये. वन्यप्राण्यांची तस्करी करणार्‍यांची माहिती वन विभागास द्यावी. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. वन्यप्राणी तस्करीसह बिबट्याची कातडी विक्रीप्रकरणी वन विभागाकडून सखोल तपास केला जात आहे. : केतन बिरारीस, वन परिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी

असा होणार वन विभागाकडून तपास

  • अटकेतील तस्कर रेकॉर्डवरील आहे की नाही. 
  • त्यांनी बिबट्याला ठार करण्यापूर्वी वन्यप्राण्यांची तस्करी केली आहे की नाही.
  • वन्यप्राणी तस्करीमध्ये संघटित गुन्हेगारी असून, आणखी कोण तस्कर आहेत.
  • तस्करांनी बिबट्याला ठार केल्यानंतर त्यांची हाडे, मांस, दात्यांचे काय केले.
  • ठार केलेला बिबट्या अंदाजे ५ वर्षांचा असून, नर की मादी आहे. 
  • तस्कारांकडून वन्यप्राण्यांचे अवयव, कातडी कोणी घेतले आहे का.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -