घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअपर जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारावर गदा; जिल्हाधिकार्‍यांनी का उचलले हे पाऊल?

अपर जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारावर गदा; जिल्हाधिकार्‍यांनी का उचलले हे पाऊल?

Subscribe

गौण खनिज विषयक सर्वाधिकार जिल्हाधिकार्‍यांकडे

नाशिक : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार सतत चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा या कार्यालयातील गौण खनिज विभागाचा कारभार चर्चेत आला आहे. त्यामुळेच की काय अपर जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारावर गदा आणत अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्यामार्फत चालणारे गौणखनिज व त्याविषयक बाबींचे कामकाज आता जिल्हाधिकार्‍यांकडे वर्ग करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आदेश काढले.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पदभार घेतल्यापासून प्रशासकीय कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक विभागाच्या कामकाजाविषयी बारकाईने माहिती घेतांना तेथील अनागोंदी कारभाराबाबतही जिल्हाधिकार्‍यांनी माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. याच कारवाईचा हा एक भाग असल्याचे मानले जाते. जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी तडकाफडकी आदेश काढत अपर जिल्हाधिकार्‍यांचे गौणखनिज विषयक अधिकार पुढील आदेशापर्यंत स्वतःकडे वर्ग केले आहेत. या आदेशानुसार अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुक, साठवणुक याबाबत कनिष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या आदेशाविरूध्द अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल होणार्‍या अपिलांचे, पुनरिक्षणाचे कामकाज हे देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे चालवण्यात येईल असे सुचित करण्यात आले आहे. याबाबतचे कार्यालयीन कामकाज गौणखनिज शाखेमार्फत केले जाईल. तसेच गौणखनिज शाखेच्या संचिका यापुढे गौणखनिज शाखेकडून प्रशासन उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गौणखनिज विषयक कनिष्ठ अधिकारयांनी केलेल्या आदेशाविरूध्द दाखल झालेल्या अपिलांची प्रकरणे अपिल शाखेने तत्काळ गौणखनिज शाखेकडे वर्ग करावीत असेही या आदेशात म्हटले आहे. अर्थात असा तडकाफडकी निर्णय घेण्याचे कारण काय याबाबत मात्र अधिकार्‍यांनी मौन बाळगणेच पसंत केले. मात्र एकूणच गौणखनिज विभागाच्या कारभाराविषयी संशयाचे धुके दाटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -