घरक्राइममहाराष्ट्र बँक अपहार प्रकरण : उपशाखाधिकार्‍यालाही अटक

महाराष्ट्र बँक अपहार प्रकरण : उपशाखाधिकार्‍यालाही अटक

Subscribe

नाशिक : देवळा तालुक्यात  बँक ऑफ महाराष्ट्र आर्थिक अपहारप्रकरणी आणखी एका अधिकार्‍याला अटक करण्यात आल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत डांगसौंदाणे येथे कार्यरत असलेल्या या बँकेच्या उपशाखाधिकार्‍यावर मंगळवारी (दि. १) ही कारवाई करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देवळा पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली.

बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेतील आर्थिक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी रोजंदारी सफाई कामगार भगवान आहेर याला अटक केल्यानंतर देवळा पोलिसांनी शाखाधिकारी व रोखपाल यांच्यावरही कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. आता या तिघांच्या चौकशीतून अनेक पैलू उलगडत असून देवळा पोलिसांनी दि.१९ रोजी मे २०१९ ते २०२२ या कालावधीत भऊर शाखेत कार्यरत असणार्‍या परीविक्षाधीन आधिकारी (पी.ओ.) आशिष आनंदकुमार सिंग यांनाही अटक केली आहे. डांगसौंदाणे (ता. बागलाण) येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे उपशाखाधिकारी पदावर कार्यरत असणार्‍या सिंग याला मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली असून बुधवारी कळवण न्यायालयात हजर केले जाणार आहे. यातून आता फसवणुकीचा आणखी मोठा आकडा पुढे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

देवळा पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून तिघा आरोपींना कळवण न्यायालयाने प्रत्येकी सात दिवसांची पोलीस कोठडी यापूर्वीच सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत.

सुरुवातीला ३२ खातेदारांच्या तक्रारीवरून १.५० कोटींचा आर्थिक अपहार झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांतर हा आकडा वाढत आतापर्यंत ५४ खातेदारांच्या तक्रारीवरुन २ कोटी १० लाख २५ हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. अजूनही बँकेत मोठ्या प्रमाणावर तक्रारींचा ओघ सुरूच असून अजूनही अपहारांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -