घरमहाराष्ट्रनाशिकईश्वरनिष्ठांची मांदियाळी "गोदाघाट"

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी “गोदाघाट”

Subscribe

नाशिकच्या गोदावरीच्या विहंगम घाटाचे चित्र किंवा चित्रीकरण जेव्हा जेव्हा प्रसिद्ध होते, त्यावेळी यशवंतराव महाराज समाधी मंदिर हा नाशिकमधील परिचयाचा मुख्य भाग असतो. ७० फूट उंचीचे हे उत्कृष्ट काम असलेले मंदिर गंगापात्रात पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर बांधलेले आहे. १७ डिसेंबर १८८७ ला महाराजांचे महानिर्वाण झाले. त्या अंत्यसंस्काराच्या जागेवर असलेले मंदिर अनेक भाविक भक्तांच्या सहाय्याने उभारण्यात आले आहे. या सत्पुरूषाने नोकरीत दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी खजिना वाटून दिला. रंजल्या गांजलेल्यांना मदत केली.

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील मराठी वस्ती असलेल्या अनेक प्रांतातून ज्या सत्पुरूषांच्या सत्संगाचा प्रभाव जनमाणसांवर आहे. त्यातील अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे ते शिष्य होते व शेगावच्या गजानन महाराजांचा आशीर्वाद त्यांना लाभला होता. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, प. पू. यशवंतराव संत गंगागिरी महाराज, नानावली महाराज उर्फ रशुलसा वलीबाबा अवलिया, माधवनाथ महाराज, ब्रह्मनिष्ठ वामनबुवा या समकालीन संतांचा सहवास लाभला होता. महाराजांकडे या थोर पुरुषांचा मुक्काम असे. त्यांच्या शिष्य संप्रदायात पद्मनाभाचार्य, स्वामी उमाचरण महाराज, नारायण महाराज, बाबा मयेकर महाराज, शिर्डीजवळील साकुरीचे उपासनी महाराज, ढगे महाराज इत्यादींचा समावेश होता.

- Advertisement -

१९५३ ला सर्वभक्त मंडळींनी उत्सव समिती स्थापन केली. याकामी रा. श्री. (राममास्तर) कुलकर्णी यांनी व त्र्यंबक (मामा) देशपांडे यांनी पुढाकार घेतला. १९६२-६३ मध्ये उत्सवाच्या उत्कृष्ट प्रारंभाने प्रेरित होऊन समिती स्थापन झाली. महाबळ गुरुजी व गोविंदराव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. तथापि ९ सप्टेंबर १९६९ ला गोदावरी महापूर आला. त्यात स्मारकाचे अतोनात नुकसान झाले. तथापि, भाविकांच्या दृढनिर्धारातून अप्पासो खाडिलकर यांच्या प्रयत्नाने स्मारकोद्धार समिती स्थापन झाली. १९७३ मध्ये डॉ. रा. वि. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली न्यास निर्माण करून सरकारमान्य नोंदणी करण्यात आली. अनेक दानशूर व भाविकांच्या अथक प्रयत्नांतून नदीपात्रालगतच पूर्वीच्या जागेत पक्क्या सिमेंट काँक्रिटचे पूर्वाभिमुख ६० फुटांचा घेर असलेले ७० फूट उंचीचे अष्टकोनी सुंदर मंदिर उभारण्यात आले. गतवैभवाची साक्ष देणारे देव मामलेदार समाधी मंदिर हे गोदाकाठचे वैभव आहे. या स्मारकासमोर अंदाजे १२५ फूट लांब व ९० फूट रुंदीचे आणि ८० फूट लांब व ८ फूट रूंदीचा भव्य ओटा आहे. नाशिक भागातून रामकुंडाकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.

स्मारकाच्या महत्त्वाप्रमाणे पटांगण व परिसर अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचे केंद्र आहे. याच पटांगणावर धर्मांतरासंबंधीची ऐतिहासिक घटना घडली. १८२८ नंतर अंग्रजी राजवटीत ख्रिस्ती धर्माचा प्रसार हिंदुस्थानात सुरू झाला. इतर पाश्चिमात्य देशातील ख्रिस्ती धर्मप्रसारकांना आश्रय व मुभा देण्यात आली. तथापि, ख्रिस्तीकरणाचा प्रयोग जेथे जेथे म्हणून अयशस्वी झाला त्यात नाशिक क्षेत्र प्रामुख्याने होते. सुरूवातीच्या ३० वर्षांच्या कालावधीत धर्मांतराची चार प्रकरणे नाशिकमध्ये घडली. शरणपूर वसाहत याच कारणास्तव गावाच्या हद्दीबाहेर स्थापन झाली. निरनिराळ्या अमिषाने/ कारणाने जिल्ह्यातून काहीसा प्रसार यशस्वी झाला. तो नगण्य होता. याउलट १३ मार्च १९२८ ला मिस मिलर नामक एका अमेरिकन तरूणीचा शुध्दीकरण सोहळा नाशिकमध्ये पार पडला. यासंबंधी डॉ. कुर्तकोटी शंकराचार्यांच्या पुढाकाराने व पं. महादेवशास्त्री यांच्या उपस्थितीत या संस्मरणीय घटनेची प्रथम सभा यशवंतराव महाराज पटांगणावर झाली. इंदूर संस्थानचे महाराज तुकोजी होळकर यांच्याशी मिस मिलर यांचे विधीपूर्वक हिंदूकरण करून विवाहसोहळा झाला व शर्मिष्ठा नावाने राजघराण्यात त्यांचे पदार्पण झाले.

- Advertisement -

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -