घरमहाराष्ट्रनाशिकआघाडीचा आमदार युतीच्या गळाला?

आघाडीचा आमदार युतीच्या गळाला?

Subscribe

जोरदार चर्चा खरी ठरल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सध्या असलेली एकमेव जागाही गमवावी लागणार

मुख्यमंत्री आमचाच होणार यावरुन आताच भाजप-सेना युतीमध्ये सुंदोपसुंदी सुरू असताना विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजप सेनेने कंबर कसली आहे. राज्यातील एकूणच बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता लोकसभेची पुनरावृत्ती करण्यासाठी इतर पक्षातील निवडून येण्याची क्षमता असेलल्या आमदारांसाठीही युतीने कवाडे खुली केली आहेत. तर काही आमदार स्वतः युतीच्या संपर्कात असून, आगामी काळात पक्षबदलाचे जोरदार वारे वाहणार असे दिसते आहे. नाशिकमध्येही आघाडीचा एक आमदार सेनेच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा असून, तसे झाल्यास आघाडीवर आहे ती जागादेखील गमवावी लागण्याची नामुष्की ओढावणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार येत्या आठवडाभरात राजीनामे देऊन भाजपात प्रवेश करतील, असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्याने आघाडीत खळबळ उडाली आहे. पदभार स्वीकारताच दादांनी ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्र’ करण्याचा मनोदय बोलून दाखवला. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे आघाडीकडून अशा आमदारांचा शोध घेऊन त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आल्याचे समजते. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानुसार नाशिकमधील आघाडीचा एक आमदार सेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खरं म्हणजे या आमदाराने सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा राज्याचे संकटमोचक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. मात्र युतीच्या जागा वाटपात या जागेवरून मतभेद निर्माण होऊ नयेत याकरिता संबंधित आमदारास शिवबंधन बांधण्याचा सल्ला देण्यात असल्याचीही चर्चा आहे.

- Advertisement -

महाजन यांच्या सल्ल्यानुसारच या आमदाराने शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. तसे झाल्यास युतीच्या इतर इच्छुकांना अन्य पक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. बंडखोरीमुळे राज्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे लोण आता नाशिकमध्येही पसरणार असे दिसतेय. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला तर याला उत्तर देताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री पद तर दूरच, आघाडीने पन्नास जागा तरी जिंकून दाखवाव्यात असे आव्हान दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीकडून आघाडीला सुरूंग लावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -