घरक्राइममविप्र निकालानंतर मोहाडीत राडा

मविप्र निकालानंतर मोहाडीत राडा

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत वादग्रस्त ठरलेले डॉ.नानासाहेब पाटील यांच्या मोहाडी येथील निवासस्थानावर नवनियुक्त संचालक प्रवीण जाधव यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची फिर्याद पाटील यांनी केली आहे. या हल्ल्यात आपल्या मातोश्रींना मारहाण करण्यात आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, प्रवीण जाधव यांचे पुतणे प्रतीक रामराव जाधव यांनीही परस्परविरोधी पोलीस अधीक्षक कार्यालयास फिर्याद दिली आहे. त्यात डॉ.पाटील यांच्या मातोश्री यांनीच मारहाण करत प्रतीकच्या गळ्यातील 14 ग्रॅमची सोन्याची चैन चोरल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे याठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याचे समजते.

जाधव समर्थकांचा घरावर हल्ला

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (मविप्र) निवडणूक विजयानंतर टोळक्याने दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावात विनापरवानगी मिरवणूक काढत संस्थेचे शिक्षणाधिकारी नानासाहेब पाटील व मीराबाई पाटील यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. त्यानंतर टोळक्याने मीराबाईंना घरातून बाहेर आणत शिवीगाळ व मारहाण करत धमकी दिली. याप्रकरणी मोहाडी येथील मीराबाई श्रीपत पाटील यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चेतन शरद जाधव, प्रतीक रामराव जाधव, सचिन पुंडलिक जाधव, निखील माधव जाधव, सुनील अशोक जाधव, धनंजय विठ्ठल जाधव, राहुल आबासाहेब जाधव, शशिकांत उत्तम जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, मीराबाई पाटील यांचा मुलगा नानासाहेब पाटील कामानिमित्त नाशिक शहरात गेले होते. मंगळवारी (दि.३०) संध्याकाळी ५ वाजता त्यांचा मुलगा गणेश पाटील हे मोठा भाऊ नानासाहेब पाटील यांच्याकडे गेले होते. रात्री ९.३० वाजता मीराबाई पाटील व त्यांची सून सारिका गणेश पाटील घरात होत्या. मोहाडी गावातील प्रवीण एकनाथ जाधव हे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांचे कार्यकर्ते मिरवणुकीला परवानगी नसताना मिरवणूक काढून डीजेवर गाणे लावून नाचत मीराबाई पाटील यांच्या घरासमोर आले. जाधव यांचे कार्यकर्ते घराचा दरवाजावर लाथा मारुन आवाज देत होते. त्यावेळी मीराबाई पाटील यांनी दरवाजा उघडला असता चौघेजण मद्यधुंद अवस्थेत दिसले. मीराबाईंनी त्यांनी विचारणा केली असता चौघांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर घरातून बाहेर आणत सुनील अशोक जाधव, धनंजय विठ्ठल जाधव, राहुल आबासाहेब जाधव यांनी मीराबाई यांना मारहाण केली. त्यावेळी सून सारिका पाटील मध्यस्थी झाली असता तिला संशयितांनी शिवीगाळ केली. त्यानंतर संशयित मीराबाई पाटील यांना धमकी देवून सर्वजण निघून गेले. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

१४ ग्रॅम सोन्याची चैन चोरली

प्रतिक रामराव जाधव यांनी पाटील यांच्या विरोधात नाशिकच्या पोलीस अधीक्षकांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (मविप्र) निवडणुकीत प्रवीण जाधव हे विजयी झाल्यानंतर मोहाडी गावात आले. कुटुंबाच्या परंपरेनुसार गावातील मंदिरात दर्शनासाठी गेलो. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास देवदर्शन घेतल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले. त्यांनी माझे काका अर्थात प्रवीण जाधव यांचे स्वागत केले. त्याप्रमाणे देवदेवतांचे दर्शन घेत आम्ही सर्व गोपाळकृष्ण मंदिरापर्यंत रात्री 9 वाजेला पोहोचलो. त्यावेळी या मंदिराशेजारी राहणार्‍या मिराबाई श्रीपत जाधव यांनी मागील भांडणाची कुरापत काढून आम्हास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे जवळचे असलेले नानासाहेब पाटील, गणेश पाटील, सारिका पाटील व रोषन निवृत्ती पाटील हे माझ्या जवळ आले. मला म्हणाले की, आमच्यापैकी नानासाहेब पाटील हे मविप्र संस्थेत नोकरीस आहेत. तुम्ही आमचे काहीच करु शकत नाही, असे म्हणत मला जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सारीका यांनी माझी गच्ची धरली व मिराबाईंनी माझ्या दोन कानफट्यात मारल्या. माझ्या गळ्यात असलेली 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून घेत माझ्या पुढील बाजूने लाथ मारली. त्यावेळी जवळ असलेले नानासाहेब पाटील व गणेश पाटील हे म्हणत होते की, यांना सोडू नका. रोषण हा देखील मला वाईट शिवीगाळ्अ करत होता. त्यावेळी आमच्या सोबत असलेले इतर सहकार्‍यांपैकी सचिन पुंडलीक जाधव व शशिकांत उत्तम जाधव यांनादेखील आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी तिथे असलेल्या व्यक्तींनी आरोपींच्या तावडीतून मला सोडवले. त्याचदरम्यान संशयित आरोपींनी माझ्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरली. मला व माझ्यासोबत असलेल्या व्यक्तिंना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे.

माझे पुतणे प्रतिक जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. मविप्र निवडणुकीचा अथवा संस्थेतील प्रकरणांचा या वादाशी काहीही संबंध नाही. गावातील शेतीच्या वादावरुन यापूर्वी भांडण झाले आहे. त्याचे उट्टे काढण्यासाठी पाटील कुटुंबियांनी हा वाद निर्माण केला. याविषयी स्वत: प्रतिक हा देखील माहिती देणार आहे. त्यामुळे या वादाशी संस्थेचा किंवा इतर कुठलाही संबंध नाही. : प्रवीण जाधव, संचालक (दिंडोरी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -