घरमहाराष्ट्रनाशिकवीजबिल वसुलीसाठी महावितरणचा धडाका

वीजबिल वसुलीसाठी महावितरणचा धडाका

Subscribe

पूर्वसूचना न देता कृषी पंपांच्या विद्युत रोहित्रांचा पुरवठा खंडित

नाशिक : कसमादे परिसराचे मुख्य पीक असलेल्या कांदा लागवडीच्या ऐन हंगामात कृषी पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावल्याने अगोदरच मजूर टंचाईमुळे हैराण असलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. महावितरणने देवळा तालुक्यातील १५० पेक्षा जास्त रोहित्रांचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे कांदा लागवड रखडल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कसमादे परिसर हा कांद्याचे उत्पादन घेण्यात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकर्‍यांचे अर्थकारण पूर्णपणे कांदा पिकावरच अवलंबून असते. त्यामुळे या भागातील शेतकरी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. सर्वत्र एकाचवेळी कांदा लागवड व पावसाळी कांद्याची काढणी सुरू असल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कांदा लागवडीसाठी आवश्यक मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांची मोठी धांदल उडालेली असतानाच महावितरणनेदेखील वीजबिल थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून, तालुक्यातील जवळपास दीडशेच्या आसपास रोहित्रांचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कांदा लागवड रखडली असून कांदा रोपेही खराब होऊ लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीसुद्धा शेतकर्‍यांना गोड करता आली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात असतानाच त्याच्यावर शेतीपंपाच्या वीजबिल वसुली करिता महावितरण कंपनीकडून रोहित्र बंद करण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले असतानाच शेतीपंपाचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणने शेतकर्‍यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ऐन कांदा लागवडीच्या हंगामात महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला असून सक्तीच्या वीजबिल वसुलीसाठी शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. ही मोहिम थांबवून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल.
– कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

थकीत वीजबिल असलेल्या कृषीपंपधारक शेतकर्‍यांना वेळोवेळी पूर्वसूचना देवूनही बिले न भरल्याने वरिष्ठांच्या आदेशाने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. कृषी सन्मान २०२० योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा. – बंकट सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, देवळा

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -