महापालिकेचा हरित नाशिकचा संकल्प १ लाख वृक्षांची करणार लागवड

नाशिक : शहराचा विकास करत असतांना हरीत नाशिक ही संकल्पना टिकून राहावी, यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात एक लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सहयाद्री देवराई या संस्थेसह सीएसआर निधीतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने जागाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाशिक शहराचा विकास होत असताना अनेकवेळा वक्षतोड करावी लागते. मात्र, वृक्षप्रेमींचा रोष ओढावला जातो. त्यामुळे ही प्रकल्पही रखडतात. मागील काळात अशा प्रकारचे प्रसंग आढावल्याने विकासासोबतच हरीत नाशिकची संकल्पनी टिकून राहावी, यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने आता एक लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरूवातदेखील करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ५० हजार वृक्षारोपण हे सीएसआर फंडातून केले जात आहे. याशिवाय इंडियन ऑइल कंपनीच्या वतीने फाळके स्मारक येथील बुध्द विहार याठिकाणी पाचशे झाडे लावण्यात येत आहे. भारत पेट्रोलियम कंपनी देखील वृक्षारोपणासाठी इच्छुक आहे. या कंपनीला देखील महापालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय आनंदवल्लीत नदीकिनारी पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने दोन हजार वृक्षांची लागवड केली जात आहे. नाशिककरांची या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.
देशी प्रजातीच्या वृक्षलागवडीस प्राधान्य

विदेशी प्रजातीची झाडे उन्मळून अनेक अपघाताच्या घटनाही अलिकडच्या काळात घडल्या आहेत. त्यातही विदेशी प्रजातीची वृक्ष पर्यावरणाच्यादृष्टीने फारसे उपयोगी ठरत नाही त्यामुळे महापालिकेने देशी प्रजातींची वृक्ष लागवडीस प्राधान्य दिले आहे. यात पिंपळ, पेरू, चिंच, तामण वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देवराई नर्सरीतून १३६५ रोपे प्राप्त झाली असून पिंपळाची ८५०, पेरू १२५, आंबट चिंच ४०, तामण ३५० रोपे प्राप्त झाली आहे. या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. याकरीता महापालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे या मोहिमेची अंमलबजावणी करत आहेत.