मविप्र निवडणूक : ९ वाजेच्या आत अंतिम निकाल

नाशिक : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मविप्र समाज शिक्षण संस्थेचा अंतिम निकाल सोमवारी (दि.29) 9 वाजेच्या आत जाहीर करण्याच्यादृष्टीने निवडणूक मंडळाने नियोजन केले आहे. मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील कै. तुकाराम रौंदळ सभागृहात 24 टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी होणार आहे.

मविप्र निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्कर चौरे, सदस्य रामदास खांदवे, अ‍ॅड. महेश पाटील व संस्थेचे ए. टी. खालकर यांनी मंगळवार (दि.23) रोजी मतमोजणी ठिकाणांची पाहणी केली. 2017 च्या निवडणुकीत सरचिटणीसपदाचा निकाल सर्वात शेवटी म्हणजे साधारणत: 11.30 वाजता जाहीर झाला होता. त्यातही फेरमोजणीचा अर्ज दाखल झाल्यास अंतिम निकालासाठी मध्यरात्र होऊ नये, यासाठी यंदाच्या मतमोजणी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. एकूण 24 जागांसाठी मतदान होणार असल्याने त्यादृष्टीने 24 टेबलवर मतमोजणी होईल. तत्पूर्वी, तालुक्यातील सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका एकत्रित केल्या जातील. एकत्रित झालेल्या मतपत्रिकांमधून रंगनिहाय मतपत्रिका वेगळ्या केल्या जातील. या प्रक्रियेला साधारणत: दुपारचे दोन वाजतील, असा अंदाज अ‍ॅड.चौरे यांनी व्यक्त केला. त्यानंतर खर्‍या अर्थाने मतमोजणीस प्रारंभ होईल. एका वेळी एक हजार मतांची मोजणी करायची की त्यापेक्षा कमी करायचे, याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. परंतु, रात्री 9 वाजेच्या आत अंतिम निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे.

महिलांचा निकाल सर्वात उशिरा यंदाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासह दोन महिला संचालकांच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे मतमोजणी करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. सर्व पदांची मतमोजणी एकाचवेळी सुरू होणार असली तरी सेवकांचे मतदान सर्वात कमी असल्याने हा निकाल आधी जाहीर होईल. तर सर्वाधिक वेळ महिलांच्या मतमोजणीस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतमोजणीवर २१ सीसीटीव्हींची नजर

मविप्र संस्थेच्या मतमोजणीत प्रक्रियेत कुठलाही गोंधळ होऊ नये, यासाठी मतमोजणी केंद्रात 10 तर संपूर्ण परिसरात 11 असे 21 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. केंद्राबाहेरील व्यक्तींना मतमोजणी प्रक्रिया पाहण्यासाठी बाहेर स्क्रीन बसवली जाणार आहे. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) मतदान तर, सोमवारी (दि.29) मतमोजणी होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक मंडळाने संपूर्ण तयारी केली आहे. असून, मतदान केंद्रात कुठलाही गोंधळ होऊ नये, याची पुरेपुर काळजी घेतलेली दिसते. तालुकानिहाय निश्चित केलेल्या केंद्रांवर मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या नाशिकमधील मराठा हायस्कूल शेजारील कै. तुकाराम रौंदळ सभागृहात ठेवल्या जाणार आहेत. सकाळी 8 वाजेला मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. सभासदांनाच मतमोजणी प्रतिनिधी म्हणून परवानगी दिली जाणार आहे. या ठिकाणी तब्बल 10 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे येथील प्रत्येक घडामोडीवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.