घरमहाराष्ट्रनाशिकविक्रमी कर वसुली व प्रशासकीय खर्चात बचत करत नाशिक महानगरपालिका ठरली राज्यात...

विक्रमी कर वसुली व प्रशासकीय खर्चात बचत करत नाशिक महानगरपालिका ठरली राज्यात अव्वल

Subscribe

नाशिक : नाशिक महापालिकेची विक्रमी कर वसुली, राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानाची (एनयूएलएम) अव्वल कामगिरी आणि कमी केलेला प्रशासकीय खर्च याबाबत नाशिक महानगरपालिकेने सरस कामगिरीबद्दल नगरविकास दिनानिमित्त नाशिक महापालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. यानिमित्ताने महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नगरविकास दिनानिमित्त मुंबईत संपन्न झालेल्या या गौरव सोहळयाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा सत्कार करण्यात आला. कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या वसुली मोहिमेत मागील आर्थिक वर्षाचे कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.यंदा १५० कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट होते. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच १२५ टक्के वसुली होऊन १८८ कोटी ७३ लाख रुपये इतका मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

- Advertisement -

तसेच नाशिक महापालिकेने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गंत सर्व घटकांमध्ये १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. बचत गट बनविणे, त्यांना शासनाकडून फिरता निधी देणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगाराकरीत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देणे, बेघर व्यक्तींना बेघर निवारा केंद्रा अंतर्गंत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे या सर्व घटकांमध्ये मनपाने उत्कृष्ट काम केले आहे. तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजने अंतर्गंत महाराष्ट्रात १४० टक्के काम करुन नाशिक महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तसेच नाशिक महापालिकेनेे २०२२-२३ मधील आस्थापना खर्च आटोपशीर ठेवण्यात यश मिळविले आहे. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आणि प्रभावी उपाययोजना राबवुन ३३.०३ टक्के एवढा प्रशासकीय खर्च मर्यादीत ठेवण्यात यश मिळविले आहे. मुंबईतील नगर विकास विभागाच्या या कार्यक्रमाला महापालिका उपायुक्त (एनयूएलएम विभाग) करुणा डहाळे उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -