घरदिवाळी 2022शब्दसुरांनी सजणार नाशिककरांची पाडवा पहाट

शब्दसुरांनी सजणार नाशिककरांची पाडवा पहाट

Subscribe

नाशिक : सूरमयी पाडवा पहाट.., सांज पाडवा मैफली.. अन् त्यांना दाद देणारे कानसेन नाशिककर.. हे समीकरण अलीकडे चांगलेच दृढ आहे. शहरात दरवर्षी पहाट, सांज पाडव्याचे आयोजन केले जाते. यंदा पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी असल्याने नाशिककरांसाठी हा दिवस शब्दसूरांनी सजणार आहे. शहरातील विविध सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदा पाडवा पहाट, भाऊबीज पहाट, सांज पाडवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नाशिकमध्ये कलाकारांचा मोठा राबता राहणार आहे. त्यामुळे नाशिककर रसिकांना गाण्यांच्या मैफलींची मेजवानी लुटण्याची संधी मिळणार आहे.

सांस्कृतिक वातावरणात भर टाकणार्‍या मैफलींमध्ये पाडवा पहाटचा महत्त्वाचा वाटा आहे. पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरुवात करणारा उत्सव. नाशकात गेल्या काही वर्षांपासून पाडवा पहाट या उपक्रमाला बहर आला आहे. पुण्याच्या धर्तीवर नाशकात पाडवा पहाट हा उपक्रम सुरू झाला आणि त्याला नाशिककरांची उत्स्फूर्त दाद लाभत गेली. पिंपळपारावर होणारी मैफल आता अनेक मोठ्या संस्थांमध्येही होऊ लागली आहे. ‘पाडवा पहाट’ व ‘सांज पाडवा’ भाऊबीजेसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. पाडवा पहाटसारखीच ‘सांज पाडवा’ या नावाने कार्यक्रम सुरू केले. यंदाही विविध संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

- Advertisement -
राहूल देशपांडेंच्या सूरांचा अवीट गोडवा

आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीने यंदा पाडव्यानिमित्त सूरेल गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (दि.२७) पहाटे ५ वाजता गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यानात शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांच्या स्वरांनी पहाट पाडव्याची मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि सुहास फरांदे यांनी केले आहे.

पिंपळपारावर शास्त्रीय मैफल सजणार

सांस्कृतिक विश्वात मानाचे स्थान असलेल्या पिंपळपारावरील पाडवा पहाट मैफल बुधवारी (दि.26) पहाटे 5 वाजता नेहरू चौकात रंगणार आहे. यंदा या कार्यक्रमासाठी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. मधूप मुदगल दिल्ली यांच्या गायनाची मैफल होणार आहे. त्यांना त्यांचे वडील पं. विनयचंद्र मुदगल, पं. जसराजची, पं. कुमार गंधर्व यांचे शिष्यत्व आणि मार्गदर्शन लाभले. पंडितजींना तबला साथसंगत पं. शंभुनाथ भट्टाचार्य आणि संवादिनी साथ पं. अरविंद थत्ते करणार आहेत. यावेळी परंपरेनुसार भाजप नेते विजय साने यांना सामाजिक कार्यातील योगदानासाठी संस्कृती पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या कार्यक्रमाला अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

- Advertisement -
इंदिरानगरला स्वराशिष मैफल

कलाश्री गुरूकूल संस्थेच्या वतीने इंदिरानगर येथे शनिवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता गायक डॉ. आशिष रानडे यांच्या अभंग मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील मोदकेश्वर मंदिर येथे आयोजित या मैफलीत तबल्यावर प्रसिद्ध तबलावादक रसिक कुलकर्णी, हार्मोनियमवर दिव्या रानडे त्यांना साथसंगत करतील. डॉ. रानडे हे आनंद भाटे आणि डॉ. अविराज तायडे यांचे शिष्य आहेत.

युवक मंडळाच्या वतीने साद स्वरांची

मुंबई नाका युवक मंडळ आयोजित भाऊबीज पहाट कार्यक्रमात सारेगमप लिटल चॅम्प उपविजेती स्वरा जोशी, युवा गायक चेतन लोखंडे, संगीत सम्राट उपविजेती श्रावणी महाजन, प्रसिद्ध ढोलकी वादक कृष्णा मुसळे तर, प्रसिद्ध पार्श्वगायिका मीना परूळकर निकम यांच्या साथीने स्वरांचा साज चढेल. झी युवा संगीत सम्राट महासंग्राम विजेता रवींद्र खोमणे उपस्थित असतील. उत्सव नात्यांचा फेम वाद्यवृंद आकर्षण ठरणार आहे. पहाटे साडेपाचला कार्यक्रम सुरू होणार असल्याचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी सांगितले.

रचना ट्रस्टतर्फे शुक्रवारी नृत्यानुनाद

रचना ट्रस्ट्रच्या वतीने शुक्रवारी (दि.२१) नृत्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथील नवरचना विद्यालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात किर्ती कलामंदिराच्या वतीने या कार्यक्रमात सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सुजित काळे यांची साथसंगत, ईश्वरी दसक्कर, आशिष रानडे, रागेश्री वैरागकर, पूजा तत्त्ववादी, बल्लाळ चव्हाण हे करणार आहेत. या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रचना ट्रस्टचे प्रमुख डॉ. आर्चिस नेर्लेकर व किर्ती कलामंदिर संस्थेच्या संस्थापिका रेखा नाडगौडा यांनी केले आहे. कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.

कालिदास कलामंदिरात लखलख चंदेरी

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे लखलख चंदेरी कार्यक्रम होणार आहे. कालिदास कलामंदिरमध्ये मंगळवारी (दि.२१) सायंकाळी 6.30 वाजता दिवाळी संध्या व बुधवारी (दि.२६) सकाळी 6 वाजता दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये गणेश चंदनशिवे, मधूर पाध्ये सहभागी होणार आहे.

पावसाचे सावट

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी असल्याने अनेक इच्छुकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले त्यातच कलाकारांच्या तारखांची आगाऊ नोंदणी करावी लागत असल्याने कार्यक्रम बंदिस्त सभागृहात घ्यावा की खुल्या जागेत याबाबत आयोजक विचार करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -