नाशिकमध्ये ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय; बाजारपेठ, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी

spred Awareness of Omicron variant in Mumbai through paintings
दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या लोकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. त्याचे प्रतिकात्मक चित्रण या चित्रात करण्यात आले आहे.

‘ओमायक्रॉन’ या नवीन विषाणूचा धोका लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना 23 तारखेपासून बाजारात व सार्वजनिक ठिकाणी ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि.16) घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या तुलनेत लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे. जवळपास 50 टक्के नागरिकांनी अद्याप पहिला डोसही घेतलेला नाही. अशा नागरिकांमुळे भविष्यात ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या नागरिकांनी अजून एकही डोस घेतलेला नाही, त्यांना शासकीय कार्यालये, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणे असतील किंवा बाजारपेठा आदी ठिकाणी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी घेतला आहे.या निर्णयाची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी सार्वजनिक आस्थापनांवर असेल.

यापुढे नाशिकमध्येच चाचणी
ओमायक्रॉनसाठी आवश्यक ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ ही चाचणी नाशिकमध्येच होणार आहे. नाशिकमधून सॅम्पल पुण्याला राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा अर्थात ‘एनआयव्ही’कडे पाठवण्यात येतात; परंतु, त्याचा अहवाल येण्यासाठी 15 दिवसांचा अवधी लागतो. हा कालावधी कमी करण्याच्यादृष्टिने महापालिका 10 हजार व जिल्हा परिषद 10 हजार किट खरेदी करणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.