घरताज्या घडामोडीभुईमूगाच्या शेतातील तारेच्या कुंपणाचा शॉक लागून मजूर ठार

भुईमूगाच्या शेतातील तारेच्या कुंपणाचा शॉक लागून मजूर ठार

Subscribe

इगतपुरी तालुक्यातील खंबाळेवाडी येथील मासेमारीसाठी गेलेल्या मजुराचा सोमवारी (दि.३०) सकाळी भुईमुगाच्या शेतातील तारेच्या कुंपणाचा शॉक लागून एकजण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍याने ट्रान्फॉर्मरमधून उच्च दाबेचा वीजप्रवाह शेतजमिनीत सोडला असल्याचे समोर आले आहे. त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. गोकुळ दशरथ मुकणे (22) असे मृताचे नाव आहे. भाऊराव दशरथ मुकणे (25) असे जखमीचे नाव आहे.

गोकुळ आणि भाऊराव हे दोघे कातकारी समाजातील असून ते मोलमजुरी करतात. करोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने सोमवारी (दि.३०) सकाळी ते दारणा नदीवर मासेमारीसाठी गेले होते. मासे, झिंगे, खेकडे पकडल्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले होते. ते खंबाळेवाडीजवळ आले. माणिकखांब शिवारातील भुईमुगाच्या शेतातील तारेच्या कुंपणाला दोघांचा स्पर्श झाला. त्यात गोकुळ जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ भाऊराव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुईमूगाच्या शेतात जनावरे, डुकरे येवू नये, कोणी भुईमूग चोरी करु नये, यासाठी शेतकर्‍याने कुंपणाला वीजेचा शॉक देवून ठेवला होता, असे दशरथ मुकणे याने घोटी पोलिसांना सांगितले. पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व वीज वितरण कंपनीचे अधिकारी पाटील करत आहेत.

- Advertisement -

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मोलमजूरी करणार्‍या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतजमिनीवर बेकायदा वीजप्रवाह सोडल्याप्रकरणी शेतकरी व वीजवितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. गोकुळ मुकणे यांच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी श्रमजिवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी तहसीलदार अर्चना भाकड यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -