घरमहाराष्ट्रनाशिकजैविक कचरा प्रकल्प पाथर्डीला हलवणार

जैविक कचरा प्रकल्प पाथर्डीला हलवणार

Subscribe

स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत सभापतींचा निर्णय

नाशिक : कन्नमवारपुलानजिकचा जैविक कचरा विल्हेवाट प्रकल्प पाथर्डी स्थित खतप्रकल्पाच्या जागेत स्थलांतरीत करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी सोमवारी(दि.२८) प्रशासनास दिले. पंचवटी व सातपूर विभागातील घंटागाडीच्या ठेक्याच्या प्रस्तावासह विविध विकासकामांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकमधील स्थायी समितीची शेवटची सभा सोमवारी (दि.२८) सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. सभा पटलावरील पंचवटी व सातपूर विभागातील घंटागाडी ठेक्याच्या प्रस्तावासह जादा विषयातील विविध प्रस्तावांना या सभेत मंजुरी देताना समितीतील सर्वपक्षीय सदस्यांनी सभापती गिते यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचे कौतुक केले.

गिते यांच्या सभापतीपदाच्या सलग दोन वर्षांच्या कारकीर्दीत शहरातील अनेक महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याचे सांगताना शहर विकासात भर पडल्याचे गौरवोद्गार समितीतील कॉँग्रेसचे सदस्य राहुल दिवे यांनी काढले. सभापती गिते यांनी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कन्नमवार पुलानजीकचा जैविक कचरा विल्हेवाट प्रकल्प पाथर्डी स्थित खतप्रकल्पाच्या जागेत स्थलांतरीत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती सभापती गिते यांनी दिली.

- Advertisement -

गिते म्हणाले, भाजपने आपल्याल्या सलग दोन वर्षे स्थायी समितीच्या सभापतीपदाची संधी दिली. या दोन वर्षांच्या कारकीर्दीत कोरोनासारख्या महामारीचे मोठे आव्हान होते. या संकळाचा सामना करण्यासाठी सभापती म्हणून जे-जे कर्तव्य होते ते प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आपण केला. कोरोनाबाधितांना उपचार मिळण्यासाठी नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयातील बेडची संख्या पाचशेवरून ८५० पर्यंत वाढविली. दुसजया लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयासह महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरमध्ये १२ ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी केली.

कोरोनाचे सत्वर निदान होण्यासाठी अ‍ॅन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या प्रस्तावांना चालना दिली. सिंहस्थ निधीतून खरेदी केलेल्या परंतू प्रलंबित असलेल्या एमआरआय व सीटी स्कॅन यंत्रे बिटको रुग्णालयात कार्यान्वित करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली. शहरात नवीन जलकुंभ, रिंगरोडसह रस्ते विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविली. स्मार्ट लाईटींगच्या प्रस्तावाला चालना दिल्याने हा प्रकल्प आता पुर्णत्वास आला आहे. आयटी हब,लॉजिस्टीक पार्कसारख्या महत्वांकाक्षी योजनांना लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. त्यादृष्टीने अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे, असे सभापती गणेश गिते यांनी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -