घरमहाराष्ट्रनाशिकसाखर कारखान्यात दारू गाळणारेच वाईन धोरणाविरोधात: भुजबळ

साखर कारखान्यात दारू गाळणारेच वाईन धोरणाविरोधात: भुजबळ

Subscribe

छगन भुजबळांचा विरोधकांना टोला

नाशिक : राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर राज्यात चांगलेच रान पेटले आहे. शासनाच्या या निर्णयाला भाजपसह अनेकांनी विरोध दर्शवला असताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाला विरोध करणार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. जे विरोध करतात त्यांच्या साखर कारखान्यात दारू गाळली जाते, असा टोला लगावत मीडियाने याचा शोध घ्यावा, असे सांगत त्यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत भाजपकडून कडाडून विरोध होत आहे. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, कोणत्याही निर्णयाला सुरूवातीला विरोध होतच असतो. नाशिकमध्येच बघा ना गंगापूर धरणावर बोट क्लब सुरू करण्यापूर्वी मोठा विरोध झाला. पाणी प्रदुषित होईल, पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे सांगितले जात होते. आज चित्र काय आहे? सगळेच बोट क्लबवर पर्यटनाचा आणि बोटिंगचा आनंद घेतात.

- Advertisement -

वाईनबाबत बोलायचे तर वाईन ही दारू नाही. वाईनला हेल्थ फूड म्हणून जगमान्यता मिळाली आहे. मग त्यावर एवढी आरडाओरड करण्याची काय गरज आहे. मध्यप्रदेशात तर मोठ्या प्रमाणात मद्य घराघरात ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. विरोध करणार्‍यांनी गोव्यात काय परिस्थिती आहे हेही पाहावे. विशेष म्हणजे जे लोक साखर कारखान्यात दारू गाळतात तेच वाईनला विरोध करतात, असे सांगत अशा लोकांची नावे मीडियाने शोधावी, असेही भुजबळ म्हणाले.

शाळा ऑफलाईन मग परीक्षा का ऑनलाईन?

परीक्षा ऑनलाईन घ्यावी, या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, शाळा-महाविद्यालये बंद होती तर म्हणे सुरू करा. आता सुरू केली तर म्हणतात परीक्षा ऑनलाईन घ्या. शाळा, महाविद्यालये ऑफलाईन अन परीक्षा ऑनलाइन कसे शक्य आहे, असे सांगत याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -