घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनिळवंडेच्या पाण्यावरून राजकारण तापले; 'धरण व कालव्यांचे श्रेय फक्त बाळासाहेब थोरात यांनाच'...

निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण तापले; ‘धरण व कालव्यांचे श्रेय फक्त बाळासाहेब थोरात यांनाच’ : डॉ. सुधीर तांबे

Subscribe

नाशिक : उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण हे जीवनाचे ध्यासपर्व मानून माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी धरण पूर्ण केले. याचबरोबर डाव्या व उजव्या कालव्याची कामे कोरोना संकट काळातही सुरू ठेवून ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले. कामे अंतिम टप्प्यात आले असताना सरकार बदलले. तरीही पाठपुरावा सुरूच ठेवणार्‍या आ. थोरात यांच्या अथक प्रयत्नातूनच कालव्यांची चाचणी होणार असून कालव्यांचे व धरणाचे श्रेय हे आ. बाळासाहेब थोरात यांनाच असल्याचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सांगीतले.

निळवंडे धरणाच्या कालव्यांची पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याबाबत बोलताना आ. डॉ. तांबे म्हणाले की, तळेगावसह दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासाठी आग्रह कायम ठेवला. ९५ ते ९९ या काळात भाजपाचे सरकार होते त्यांनी त्यावेळी सुद्धा धरणासाठी कोणतेही काम केले नाही. मात्र अनेक अडथळ्यांना नंतर आ. बाळासाहेब थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथम राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प आ थोरात यांनी राबविला. अनेक अडथळे पार करून हे धरण २०१२ ला पूर्ण केले.या कामी माजी मंत्री मधुकर पिचड यांचेही सहकार्य लाभले. याच काळात कौठेकमळेश्वर, पिंपळगाव कोझिंरा, गणेशवाडी या मोठमोठ्या बोगद्यांच्या कामांसह कालव्यांची कामे ही प्रगतीपथावर ठेवली. मात्र २०१४ ते १९ या काळात भाजपा सत्तेवर आले या काळातील थांबलेली सर्व कामे जनतेला माहिती आहे. किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. फक्त प्रसिद्धीसाठी बातम्या पेरल्या गेल्या. मात्र वस्तुस्थितीत याही काळात कालव्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आ. थोरात यांनी वेळोवेळी आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.

- Advertisement -

कालव्यांची कामे पूर्ण थांबलेली असताना २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले यामध्ये बाळासाहेब थोरात यांना महसूल मंत्रीपदासह सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळाली. त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून कालव्यांच्या कामाला पुन्हा गती दिली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठा निधी मंजूर करून घेतला. सातत्याने कामाचा पाठपुरावा केला. २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले. तरी अशा काळातही कोणतीही प्रसिद्धी न करता अकोले तालुक्यातील ० ते २८ ची कामे जलद गतीने मार्गी लागावे यासाठी कामांची वेळोवेळी पाहणी केली. याच काळात विविध नद्यांवरील पुलांची कामे, स्ट्रक्चरल कामे सुरु ठेवली.

ऑक्टोबर 2022 मध्ये दुष्काळी भागाला पाणी द्यायचे हे उद्दिष्ट ठेवून काम केले. मात्र सरकार बदलले आणि पुन्हा एकदा कामांची गती मंदावली. तरीही कालव्यातून पाणी सोडण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला. सध्या भंडारदरा व निळवंडे धरण मिळून दहा टीएमसी पाणी असल्याने या कालव्यांमधून चाचणी घेणे शक्य आहे याकडे आमदार थोरात यांनी पत्राद्वारे सरकारचे लक्ष वेधले. सतत निळवंडे धरण व कालव्यांचा ध्यास घेऊन दुष्काळग्रस्तांच्या शेतात पाणी देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणार्‍या आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच कालव्यांची चाचणी होणार असून या कामाचे पूर्ण श्रेय हे आमदार थोरात यांनाच असल्याचेही आ. डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -