घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी

नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी

Subscribe

दिवाळी सणासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ

नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि.१७) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अक्षरश: दाणादाण उडाली. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

शहरासह जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, दिंडोरीसह शहराच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत असताना दुपारी अडीचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. त्यानंतर पुढील काही मिनिटांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस जोरात असल्याने रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. गोदाघाटावरील गटारी ओव्हर फ्लो झाल्या.

- Advertisement -

अचानक आलेल्या या पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मेनरोड परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आडोशासाठी धांदल उडाली. तर स्मार्ट सिटीच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. दुसरीकडे पावसाने रस्त्यावरील लहान-मोठ्या विक्रेत्यांनाही फटका बसला. पावसापासून मालाचा बचाव करताना विक्रेत्यांना अक्षरश: नाकीनऊ आले. परतीच्या पावसाने देवभूमी केरळला दणका दिला असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -