वय कमी दाखवून लष्कारात भरती

वय कमी दाखवून तरुणांची लष्करात भरती करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील डावरे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एकास अटक केली असून, त्याच्या ताब्यातून बनावट शिक्के व कागदपत्रे जमा केली आहे. गौतम गंगाराम पगारे (वय ५९, रा.हाडोळा, देवळाली कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प येथील मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हिसमध्ये एकजण तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून देत असून तो देवळाली कँम्पमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील त्रिमूर्ती चौकात तवेरामधून एकास ताब्यात घेतले. त्याने गौतम गंगाराम पगारे (वय ५९, रा.हाडोळा, देवळाली कॅम्प) असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट दोन शिक्के आढळून आले. तसेच, तवेरामध्ये मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हिस यांचे नावे असलेले रबरी व प्लॅस्टिकचे शिक्के, बंद पाकिटे, अपॉयमेंट लेटर, भारतीय हवाई दलाचे लेटरहेड आढळून आले.