घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रट्रॅव्हल्स कंपनीच्या ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची सुटका

ट्रॅव्हल्स कंपनीच्या ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची सुटका

Subscribe

नाशिक : ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे नाशिकमधून व्हिसाविनाच मलेशियात गेलेल्या १५ पर्यटकांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेथील भाषेचा अडसर येत असल्याने पर्यटकांनी नाशिकला फोनद्वारे संपर्क साधत आपबिती सांगितली. त्यानंतर खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेर सर्व पर्यटकांची सुरक्षित घरवापसी झाली. या प्रकारामुळे बनवेगिरी करणार्‍या ट्रॅव्हल्स एजंट्सचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नाशिक येथील सुभाष ओहोळे, मीनाक्षी ओहोळे, अरूण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनील म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, प्रवीण नुमाळे, द्रौपदी जाधव व इंदूबाई रूपवते यांनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटमार्फत मलेशिया पर्यटनाचे नियोजन केले होते. या पर्यटकांना घेऊन एजंट हैदराबादला गेले. तेथून १९ पैकी चार जणांच्या विसाचे काम अपूर्ण होते. तुम्ही विमानाने पुढे जा मी सायंकाळी चौघांना घेऊन मलेशियाला येतो, असे सांगत एजंटने १५ पर्यटकांना मलेशियाच्या विमानात बसवून दिले. एक दिवस उलटून गेला तरी एजंट मलेशियात पोहोचला नाही व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने पर्यटकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकले. पोलिसांच्या प्रश्नांना पर्यटकांकडून सुयोग्य असे उत्तर मिळत नसल्याने पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. पोलिसांनी सर्वांचे पासपोर्ट जप्त करत त्यांना क्वॉरंटटाइन केले.

- Advertisement -

पर्यटकांच्या नाशिक येथील नातेवाईकांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने खासदार गोडसे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार गोडसे यांनी लगेचच देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. खासदार गोडसे यांच्या पत्राची दखल घेऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी एम्बेसीला या घटनेची माहिती कळवली. एम्बेसी प्रशासनाने लगेचच संबंधित पोलीस स्टेशनची संपर्क साधला.

ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे हे पर्यटक अडकले असून त्यांचे पासपोर्ट त्यांना परत देऊन त्यांना भारतात पाठवावे असे आदेश दिले. त्यानंतर मलेशिया पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट परत करून त्यांना हैदराबादसाठीच्या विमानात बसवून देत मायदेशी पाठविले. बुधवारी (दि.9) हे पर्यटक नाशिकला पोहोचले. या पर्यटकांनी खासदार गोडसे यांची भेट घेत मनोमन आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -