वाढता वाढता वाढे गुन्हेगारीचा आलेख..!

दिलीप कोठावदे । नवीन नाशिक

सतर्क राहा, सुरक्षित रहा..
चहुअंगाने शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. उपनगरांमध्ये अनेक सोसायट्या झाल्या आहेत. फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारी कोण राहतो, याची नागरिकांनाही माहिती नसते. त्याचादेखील फायदा चोरटे घेतात. शेजारी हाच खरा राखणदार असतो, याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताने शेजार्‍यांना सांगावे. तसेच, स्वतःच्या देखील सुरक्षिततेबाबत दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. पोलिसांकडे मनुष्यबळाचीदेखील कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, यातच शहाणपण आहे.

निसररम्य, शांत, सुंदर व सुरक्षित शहर म्हणून नाशिक शहर ओळखले जाते. परंतु, अलिकडे वाढत असलेली गुन्हेगारी पाहता ही ओळख पुसली जातेय की काय अशी भिती निर्माण होऊ लागली आहे. शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या, सोनसाखळी, मोबाईल, वाहनचोर्‍या आणि रात्री जबरी चोरीचे गुन्हे घडू लागले आहेत. हाणामार्‍या तर नित्याचाच झाल्या असून एकामागे एक घडणार्‍या खूनांच्या मालिकेने गुन्हेगारीचा आलेख शिखरावर नेला आहे.
कोरोनामुळे आलेल्या आर्थिक डबघाईतून सर्वसामान्य माणूस सावरू पाहात असताना पै-पै करून जमविलेल्या बचतीवर चोरटे डल्ला मारू लागले आहेत. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने त्यांचे धारिष्ठ्य चांगलेच वाढले आहे. खबर्‍यांचे जाळे कमकुवत झाल्यामुळे पोलीस सीसीटीव्ही पाहण्यातच अडकले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांतील खाकीची दहशत कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचं विदारक चित्र आहे.

खरं तर आपले नाशिक हे कायदा-सुव्यस्था व येथील भौगोलिक वातावरणाच्या दृष्टीने खूप उत्तम व सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नाशिकला प्रथम पसंती दिली जाते. नोकरी करणारे निवृत्तीनंतर राहण्यासाठी नाशिकचीच निवड करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. पण, अलिकडे शहरातील गुन्हेगारीत वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच, शस्त्राचा धाक दाखवून भरदिवस दरोडा, जबरी चोरी करून लाखोंचा ऐवज चोरण्याचे प्रकार घडू लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये घरफोड्या व वाहनचोर्‍या करणार्‍या चोरट्यांनी शहरात हैदोस घातला आहे. दिवसाला शहर परिसरातील कोणत्या न कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्यांची मालमत्ता सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होत आहे. घरफोडी करताना चोरटे हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे अनेक घटनांवरून दिसते. शहराच्या वेगवेगळ्या भागात एकामागे एक होणार्‍या खुनाच्या घटनांनी तर नाशिक असुरक्षिततेच्या या भावनेला खतपाणीच घातले आहे.

‘डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेन्शन’ हे गुन्हेगारी रोखण्याचे तत्व आहे. पण, यामध्येच पोलीस कमी पडताना दिसत आहेत. वाहनचोरांनी कहरच केला असून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. उन्हाळा, सणासुदीच्या सुट्टी आणि पाऊस सुरू झाल्यानंतर घरफोड्यांचे प्रमाण वाढते. ही गोष्ट सर्व अनुभवी पोलिसांना सांगायची गरज नाही. या वर्षी उन्हाळ्यातील घरफोड्या रोखण्यात पोलिसांना फारसे यश आले नाही. पावसाळा तोंडावर असताना घरफोड्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्यासंबंधी नियोजन पोलिसांकडून केले जाणे गरजेचे आहे. घरफोड्या रोखण्यासाठी सोसायट्यांना सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक नेमण्यासाठी पोलिसांकडून आवाहन केले जाते. त्यानुसार काही सोसायट्यांकडून त्याची अंमलबजावणी केली जाते. पण, काही सोसायट्या त्याकडे दुर्लक्ष करतात. घरफोडी झाली की चोर पकडण्यासाठी सीसीटीव्हीचा पोलिसांना उपयोग होतो. मात्र, घरफोडीच्या घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात पोलीस कमी पडत आहेत. रात्रीच्या वेळी घरफोड्याचे प्रकार जास्त असतात. या घरफोड्या होऊ नये म्हणून पोलिसांकडून घातली जाणारी गस्त कमी पडत आहे. त्याचा फायदा चोरटे घेतात. एखादी घटना घडल्यानंतर घटनास्थळी दाखल होण्याचा पोलिसांच्या ‘रिस्पॉन्स टाईम’मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

घरफोडी किंवा एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस सीसीटीव्हीचा आधार घेऊन गुन्हेगाराचा शोध घेतात. पण, सीसीटीव्ही हा गुन्हा घडल्यानंतरच्या तपासासाठी उपयोगी ठरतात. पोलीस सीसीटीव्ही व मोबाइल डेटा या तांत्रिक गोष्टीवरून गुन्हेगाराचा माग काढण्याचा प्रयत्न करतात. पूर्वीसारखे पोलिसिंग होत नसल्यामुळे पोलिसांचे खबर्‍यांचे जाळे कमी झालेले प्रकर्षाणे जाणवतेय. त्यामुळे गुन्हेगारांच्या शोधासाठी त्यांना या तांत्रिक तपासावरच आवलंबून राहवे लागते.
चोरटेदेखील आता खूप हुशार झाले असून, बर्‍याचदा सीसीटीव्हीचा डीव्हीआर सोबत घेऊन जातात. चोरीच्या ठिकाणी मोबाईल वापरत नाहीत. त्यामुळे तांत्रिक गोष्टींच्या आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अडचणी येत असल्याचेही अनेक घटनांमध्ये उघड झाले आहे. गुन्हा घडल्यानंतर त्याची कार्यपद्धती, कोणत्या सराईताने केली असेल याची माहिती तत्काळ पोलिसांना मिळत होती. पण, त्यामध्ये पोलीस कमी पडू लागले असल्याचे बोलले गेल्यास वावगे ठरू नये.