Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना काहीसा दिलासा; पिकविम्याच्या 25 टक्के रक्कम देण्याचे आदेश

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना काहीसा दिलासा; पिकविम्याच्या 25 टक्के रक्कम देण्याचे आदेश

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील ९२ महसूल मंडलांपैकी निम्म्याहून अधिक मंडलांवर दुष्काळाच्या तीव्रतेचे संकट घोंगावत असून, शेतीतील उभी पिके करपू लागली आहेत. आता पाऊस झाला तरीही शेतकर्‍यांच्या हाती काही लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीचा विचार करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कापणीपूर्व मदत म्हणून शेतकर्‍यांना पिकविमा रकमेच्या २५ टक्के रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ओरिएन्टल पिकविमा कंपनीला दिले आहेत.

जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक मंडलांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने तेथे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खरिप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी, मुग, भुईमुग, तुर व भाताचे ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा कृषी विभाग व पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्र्व्हेे केला. त्यानुसार निफाड, नाशिक, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, देवळा, सटाणा, नांदगाव व येवला तालुक्यांतील ५५ महसूल मंडलांमधील विमा उतरवलेल्या शेतकर्‍यांना महिन्याच्या आत ही विमारक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होणार असेल तर अशा शेतकर्‍यांना नुकसानभरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत कापणीपूर्व मदत देण्याबाबत शासननिर्णय आहे. जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकर्‍यांनी पिकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. त्याआधारे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुकसान सर्वेक्षण गोषवारा अंतिम होण्यापूर्वीच शेतकर्‍यांना २५ टक्के भरपाई एक महिन्यात देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

गेल्या २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही, अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करुन विमा कंपनीला मदत करण्याच्या अधिसूचना दिली आहे. एक महिन्याच्या आत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना काही प्रमाणात मदत मिळू शकते. : संजय सोनवणे, जिल्हा कृषी अधीक्षक, नाशिक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -