घरमहाराष्ट्रनाशिकएसटी कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

एसटी कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

Subscribe

मागणी मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची एसटी कामगारांची भूमिका

मनमाड : एसटी कामगारांचा संप मिटता मिटेना. गेल्या 32 दिवसांपासून मनमाड आगारातील सर्व 238 कामगार संपावर असून महामंडळ प्रशासनाने 30 कामगारांना निलंबित तर 3 कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकीकडे महामंडळ प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली तर दुसरीकडे कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ते ठाम आहेत. जोपर्यंत मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. एसटी बंद असल्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असून त्यांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढून एसटी सुरु करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी एसटी कामगार गेल्या 32 दिवसांपासून संपावर आहे. मध्यंतरी परिवहनमंत्री अनिल परब यांनी वेतनवाढ केल्यानंतर कामगारांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याला न जुमानता कामगारांनी संप सुरूच ठेवला असून महामंडळ प्रशासनाने संपात सहभागी झालेल्या 30 कामगारांना निलंबित केले असून 3 कामगारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. शिवाय कामावर रुजू न झाल्यास मेस्मा लावण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र मेस्मा लावा अथवा कोणतीही कठोर कारवाई करा आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून मागणी मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कामगारांनी घेतली आहे.

केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या नंतर त्यांना लेखी आश्वासन दिल्यामुळे त्यांनी त्यांचा आंदोलन मागे घेतलं तसे राज्य शासनाने विलीनीकरण करण्या बाबत कोर्टात लेखी द्यावे तसेच आम्हाला सातवा वेतन लागू केला जाईल,आमचे वेतन वेळेवर होतील या बाबत लेखी दिल्यास आम्ही लगेच संप मागे घेऊन कामावर रुजू होण्यास तयार आहोत.
– रवी सांगळे, एसटी कामगार नेते

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -