घरमहाराष्ट्रनाशिककष्टासह दुःख सहन करण्याची तयारी ठेवल्यास यश हमखास; चेतन भगत वसंत व्याख्यानमालेत...

कष्टासह दुःख सहन करण्याची तयारी ठेवल्यास यश हमखास; चेतन भगत वसंत व्याख्यानमालेत प्रतिपादन

Subscribe

नाशिक : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तरुणांनी कष्टाची तयारी व दुःख सहन करण्याची सहनशीलता अंगीकारावी, असे आवाहन जगप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी सोमवारी (दि.२२) केले. तरुणपणात तरुण वाटणे किती महत्वाचे आहे, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. वसंत व्याख्यानमालेंतर्गत स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यानाच्या रुपाने 22 वे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रायोजक अमोल गोठी, सारस्वत बँकेचे संचालक हेमंत राठी, नामको बँकेचे महाव्यवस्थापक दीक्षित, माजी नगरसेवक विक्रांत मते, उद्योजक सुजॉय गुप्ता, नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सुभाष देशमुख आदी उपस्थित होते. लेखक चेतन भगत यांनी जीवनातील ध्येय गाठण्यासाठी युवकांपुढील आव्हाने या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आर. के. कलानी ज्युनिअर कॉलेज व सिंधू सागर अकॅडमी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकधारा या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. मुख्याध्यापिका सिमरन मखीजानी, नृत्य शिक्षक पंकज गांगुर्डे, प्रदीप गोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार प्रा. शंकर बोर्‍हाडे, विजय हाके, उषा तांबे, संगिता बाफणा, मनीष सानप आदींनी केला. जगप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना नाशिक शहरातील सर्वच वयाचे लोक एका लेखकाचे विचार ऐकण्यासाठी आलेत हाच आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगितले.

मनोरंजनसोबतच, प्रेरणात्मक विचार देऊन मी आपले जीवन बदलण्यासाठीच आलोय, असे सांगत त्यांनी गोदाकाठचे वातावरण, मंदिरातील देवादिकांच्या साक्षीने सांगतोय, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. भगत यांनी आपल्या विचार प्रवाहात सर्वच वयातील लोकांसाठी सुखी समाधानी जगण्याचे अनेक मार्ग सांगितले. जीवनात यशस्वी होणे आणि सुखी होणे किती महत्वाचे आहे हे सांगताना पैसा हेच सर्वस्व नसल्याचे अनेक उदाहरणांवरून त्यांनी श्रोत्यांना सांगितले. करिअर (पेशा व्यवसाय), हेल्थ (आरोग्य) आणि रिलेशनशिप (परस्परांशी संबंध) या तीन पायांचे टेबल म्हणजेच जीवन असल्याचे भगत यांनी सांगितले. या पायांशिवाय जीवन अपूर्ण असल्याचे त्यांनी लहान उदाहरणांवरुन श्रोत्यांना पटवून दिले.

- Advertisement -

उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, मधुमेह आणि मेंदूविकार हे चार मौत के चौकीदार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांसाठी अ‍ॅक्टिव्ह राहणे, अ‍ॅक्शन घेणे अतिशय महत्वाचे आहे, असे सांगताना तरुणांनी दारू, सिगारेट आणि फोन या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. टार्गेट ठेवावे, लंबी मेहनत म्हणजेच जास्तीचे प्रयत्न करावे, स्वयंशिस्तता लावावी, सकारात्मक आणि आनंदी राहावे, असे सांगतानाच त्यांनी यशस्वी लोकांची कार्यपद्धती, जगण्याचा मार्ग आणि कष्ट घेण्याची पद्धती त्यांनी समजावून सांगितली. रोज शरीरासाठी कसरत करा, योग्य आहार विहार असावा आणि जीवन जिंकण्याची उर्मी असावी, असे विचारही यावेळी भगत यांनी व्यक्त केले. आयुष्यात कष्ट आणि दुःख सहन केल्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे तरुणांनी सहनशील आणि यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. व्याख्यानाच्या दुसर्‍या सत्रात प्राजक्ता भट-वर्टी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर भरतनाट्यम नृत्य सादर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -