आक्रमणे पचवून समर्थ झालेली मराठी भाषा अभिजातच; ज्येष्ठ साहित्यिक सासणे यांचे प्रतिपादन

नाशिक : मराठी भाषेवर आजवर अनेक आक्रमणे झाली. मात्र, ही सर्व आक्रमणे पचवून मराठी भाषा समर्थ बनली. मराठी भाषा आपल्या धमन्यांतून वाहत असल्याने ती अभिजातच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन सासणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. बी. जी. शेखर, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन, संजय वाघ, प्राजक्त देशमुख आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक सासणे मराठी भाषेच्या उत्पतीबद्दल बोलताना म्हणाले की, आपली मराठी भाषा ही 2500 वर्षे जुनी भाषा असल्याचे विविध पुरावे 80 प्राचीन ग्रंथात आढळून येतात. भाषा शास्त्रज्ञांनी 200 प्रमुख भाषांची 12 गटात विभागणी केली असून, मराठी भाषा 72 पेक्षा अधिक देशांमध्ये बोलली जाते. त्याचबरोबर 2200 वर्षापूर्वी नाणेघाटात शीलालेख आढळून आला आहे. हा शीलालेख ब्राह्मी भाषेत असून, या शीलालेखावर मराठीचा उल्लेख आढळून येतो. याचाच अर्थ मराठी भाषा ही प्राचीन असल्याचे सिद्ध होते.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत बोलताना सासणे पुढे म्हणाले की, भाषा लुप्त झाली की, संस्कृती लुप्त होते. याकरीता मराठी भाषा जपणे आवश्यक आहे. आपण मराठी भाषेविषयीचा आपल्यातील न्यूनगंड काढून टाकून अभिमान बाळगला पाहिजे. तरुण पिढीत इंग्रजीचा वापर वाढला आहे. तरुणवर्ग मराठी भाषेपासून दूर जात आहे. तरुणांनी इंग्रजीबरोबर मराठी भाषाही शिकली पाहिजे. त्यांच्यात मराठीचा व्यासंग वाढण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, गणिती शब्दांना पर्यायी मराठी शब्द आणणे आवश्यक आहे. आपली मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी मराठी वाचनालये सुरू झाली पाहिजे. तसेच, मराठी शाळाही सुरू राहिल्या पाहिजे. मराठी भाषा आपल्या धमन्यांतून वाहत असल्यानेे ती अभिजात आहेच. तिला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, कुसुमाग्रजांच्या भूमीत आपले वास्तव्य आहे हे आपले भाग्य आहे. नाशिक शहरातील लघु नाट्यमंदिरांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. शेखर म्हणाले, एका शब्दाचे अनेक अर्थ निघणारी आपली सर्वगुणसंपन्न मराठी भाषा आहे. आपल्या वागण्या-बोलण्यात व संस्कृतीत बदल झाले असले तरी आपलेपण जपण्यासाठी मराठी भाषा जपणे आवश्यक आहे.

प्रा. फडके यांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर विचार मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्यगीताची धून वाजविण्यात आली. प्रास्ताविकात उपायुक्त रमेश काळे यांनी कविवर्य कुसुमाग्रज हे आपल्या सर्वांचे भूषण असून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यामागील शासनाची भूमिका विशद केली. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन, संजय वाघ, प्राजक्त देशमुख यांचा तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन कैलास चावडे व सोनाली मंडलीक यांनी केले. उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी आभार मानले. यावेळी उपायुक्त उन्मेष महाजन, बी. जी. वाघ, धर्माजी बोडके, संजय करंजकर, श्रीकांत बेणी, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महसुल, जिल्हा परिषद, पालिका अधिकारी, पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.