घरमहाराष्ट्रनाशिकझाकीर हुसेन रुग्णालयासह नवीन बिटकोत आता कोविड नसलेलेही दाखल

झाकीर हुसेन रुग्णालयासह नवीन बिटकोत आता कोविड नसलेलेही दाखल

Subscribe

माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची माहिती

नाशिक : कोरोना प्रभाव कमी होताना दिसत असून शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या शंभरावर आली आहे. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि नवीन बिटको रुग्णालयात अवघे ११ रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि नवीन बिटको रुग्णालयांचा कोविड रुग्णालयांचा दर्जा काढून घेत, या ठिकाणी नॉन कोव्हिड रुग्णांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयांमध्ये आता कोव्हिडसोबतच नॉन कोव्हिड रुग्णांना सेवा दिली जाणार असून त्यांना उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपाठोपाठ ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे करोनाची तिसरी लाट सर्वांत घातक ठरेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असला तरी शहरात लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शहरात तिसरी लाट सौम्य झाली आहे. शहरात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने महिनाभरातच करोना उतरणीला लागला आहे. गेल्या २३ जानेवारी रोजी शहरात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला होता. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १०,९४८ पर्यंत पोहोचली होती, तर पॉझिटिव्हिटी दर ३९ टक्क्यांपर्यंत होता. परंतु,आता हाच दर घटला असून करोनामुक्तीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत शहरात १०५ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे. त्यापैकी नवीन बिटकोत ११ तर, डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात अवघा एक रुग्ण दाखल आहे.त्यामुळे वैद्यकीय विभागाने आता या दोन रुग्णालयांचा कोविडचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात आता नॉन कोविड रुग्णांसाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यापासून नवीन बिटको रुग्णालय देखील सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे.

जुन्या बिटको रुग्णालयातील स्टाफ या ठिकाणी स्थलांतरीत केला जाणार असून तीन मजल्यापैकी केवळ एकाच मजल्यावर आता कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.तर अन्य दोन मजल्यावर नॉनकोविड रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. या ठिकाणी प्रथम बालकांसाठी सुरू करण्यात आलेला कक्ष अन्य रुग्णांसाठी सुरू केला जाणार आहे. सोबतच उपचारासाठी रुग्णांना दाखलही करून घेतले जाणार आहे.

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आता नॉन कोव्हिड रुग्णांसाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यापासून नवीन बिटको रुग्णालयही सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -