आज स्पष्ट होणार ‘मविप्र’ लढतीच चित्र, पॅनलववर अंतिम शिक्कामोर्तब

नाशिक : मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत शुक्रवार (दि.19) हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आगे. दोन्ही पॅनलतर्फे उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याने यात कुणाला संधी मिळते आणि कुणाचा पत्ता कापला जातो, याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे. बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत इच्छुकांना ‘वेटिंग’वर ठेवल्याने इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मविप्र निवडणुकीत शुक्रवारी (दि.19) उमेदवारी माघारीचा अंतिम दिवस आहे. तत्पूर्वी, दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी इच्छुकांच्या मुलाखती घेवून चाचपणी केली. गुरूवारी (दि. 18) आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी सभापतीपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. कोकाटे आता अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरतील. डॉ. जयंत पवार यांनीही उपाध्यक्ष, उपसभापती, चिटणीसपदासाठीचे अर्ज मागे घेतले. गुरूवारी 15 उमेदवारांनी माघार घेतली. त्यात प्रामुख्याने कोकाटे यांनी सभापतीपदासाठी केलेला अर्ज मागे घेतला. तर, डॉ. जयंत पवार यांनी पदाधिकारीपदासाठी अर्ज मागे घेतला घेतल्याने आता मालेगाव तालुका संचालकपदासाठीचा त्यांचा अर्ज शिल्लक रहिला आहे.

याशिवाय विजय कडलग, (इगतपुरी तालुका सदस्य), साहेबराव हिरे, अरूण देवरे, अशोक निकम (मालेगाव तालुका सदस्य), राजेंद्र शिंदे, सुनील पाटील (येवला तालुका सदस्य), जयराम शिंदे, मोहन पिंगळे (नाशिक ग्रामीण सदस्य), दिलीप माळोदे, दिलीप पवार (उच्च. माध्य व महाविद्यालयीन सेवक सदस्य), संगीता डेर्ले (प्राथमिक व माध्यमिक सेवक सदस्य) यांनी माघार घेतली. सत्ताधारी प्रगती व परिवर्तन पॅनलकडून पॅनलचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर साधारणपणे माघारीसाठी गर्दी होऊ शकते. शुक्रवारी (दि.१९) दुपारी 2.30 वाजता प्रगती पॅनलचे उमेदवार जाहीर होणार आहेत. तर, दुपारी 3 वाजता परिवर्तन पॅनलचे उमेदवार घोषित होणार असल्याने त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

उमेदवारांमध्ये रस्सीखेच

राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून प्रगती पॅनलकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार व शिष्टमंडळाने पॅनलप्रमुखांची भेट घेतली. प्रगती पॅनलची उमेदवारी म्हणजे विजयाची खात्री वाटत असल्याने इच्छुकांनी गुरुवारी (दि.18) गर्दी करत पॅनलप्रमुखांना साद घातली. प्रगती पॅनलची धुरा सुरेशबाबा पाटील, रामचंद्रबापू पाटील, शंकरराव कोल्हे (खेडेकर) सुरेश निकम, यशवंतबापू अहिरे, निलीमा पवार हे वाहत असून त्यांच्या भेटीसाठी नाशिक, सटाणा, चांदवड, कळवण, नांदगाव इ. तालुक्यातून आलेल्या इच्छुकांनी भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केल्याने त्यासाठी संस्थेप्रती आत्मीयता, नातेसंबंध याद्वारे उमेदवारांची शुक्रवारी (दि.१९) घोषणा करण्यात येईल.