घरमहाराष्ट्रनाशिकगणेश विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

गणेश विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

Subscribe

नाशिक : विसर्जनासाठी २९ पारंपरिक विसर्जन स्थळांबरोबरच ४२ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीघाटावर धोकादायक ठिकाणी बॅरेकेड्स लावण्यात आले आहे. याठिकाणी जीवरक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अनुपस्थित राहिल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे. तसेच, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक देखील विसर्जन स्थळी उपस्थित राहणार असून तेदेखील अनुचित प्रकार रोखणार आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधामुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता आला नव्हता. मात्र, यंदा केरोनानंतर पहिल्यांदाच नाशकात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात असून पालिकेने भाविकांची गैरसोय होणार नाही व उत्साहाला गालबोट लागणार नाही यापद्धतीने नियोजन केले आहे. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पालिका आयुक्तांची पाहणी

मिरवणुक मार्गावरील खड्डे तसेच गणेश मंडळांना येणार्‍या अडचणी, ओव्हरहेड विद्युत तारा तसेच अन्य अडचणींची माहिती घेण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वत: अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. त्यानुसार गुरूवारी रात्री उशिरापर्यंत खड्डे बुझवण्यापासून अन्य कामे करण्यासाठी अधिकार्‍यांची धावपळ सुरू होती.

- Advertisement -

साडेपाच हजार पोलीसांचा बदोंबस्त

तब्बल दोन वर्षानंतर शहरात गणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात झालं. आता विसर्जन मिरवणूक देखील त्याचपद्धतीने थाटामाटात निघणार आहे. यंदा डिजेमुक्त मिरवणूक निघणार असून पारंपारिक वाद्य वाजवत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. ही मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी नाशिक शहरात 3500 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी, राज्य राखीव दलाचे 1000 जवान, गृहरक्षक दलाचे 1000 जवान आणि 100 जीवरक्षक तैनात असतील.

विसर्जनासाठी ७१ ठिकाणं निश्चित

नाशिक महानगरपालिकेच्या सहा विभागात गणेश विसर्जन ठिकाणी विविध कामे पूर्ण केली जात आहेत. देवळाली गावात गणेश विसर्जन ठिकाणी जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यंदा मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत.

- Advertisement -

असा आहे मिरवणूक मार्ग

नाशिक शहरातील गणेशोत्सवाची मुख्य मिरवणूक चौक मंडई म्हणजेच वाकडी बारव, जहांगीर मशीद, फाळके रोड, महात्मा फुले मंडई, दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली बाजार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉईंट, रेड क्रॉस सिग्नल, एमजी रोड, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा मार्गे होळकर पुलावरून मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, कपालेश्वर मंदिर, भाजी बाजारातून म्हसोबा पटांगणावर मिरवणूक पोहोचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -