वणी येथे भीषण अपघातात तिघे ठार; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून त्यात रस्त्याच्या कामावरील मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन समोरून येणाऱ्या अल्टो कारवर पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, वणी येथील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाने बारी येथे सदर ट्रॅक्टर जात होता. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या होत्या. रस्त्याने जात असतानाच अचानक चालकाचा ताबा सुटून ट्रॉली पलटी झाल्या आणि त्यातील मजूर फेकल्या गेले त्याच वेळी ट्रॅक्टर आणि ट्रॉली समोरून येणाऱ्या अल्टो कारवर जाऊन पडला. अपघातात अल्टो कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे.

दरम्यान या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५हुन अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.