घरमहाराष्ट्रनाशिकओझरच्या 'त्या' सिद्धिविनायक पतसंस्थेच्या सभेत गदारोळ

ओझरच्या ‘त्या’ सिद्धिविनायक पतसंस्थेच्या सभेत गदारोळ

Subscribe

ओझर : येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याने एकच खळबळ महिन्याभरापूर्वी उडाली होती. या पार्श्वभूमीवर सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरत ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावे तसेच सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभासदांच्या वतीने एकमुखाने करण्यात आली. संस्थेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी संस्थेच्या खात्यातून या रकमेचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज असून याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असे संचालक मंडळाच्या वतीने सभासदांना सांगण्यात आले. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा पुरावा उपलब्ध असताना संस्थेकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने या प्रकरणात संस्थेचे संचालक मंडळ अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्था नावाजलेली असून या संस्थेची उलाढाल ७० ते ८० कोटी रुपयांच्या आसपास आहे. अतिशय पारदर्शक कारभार करणार्‍या संस्थाचालकांचे या प्रकरणामुळे बिंग फुटल्याचे दिसून आले. संस्थेच्या खात्यातून गेल्या नऊ महिन्यांपासून रकमा काढल्या जात होत्या; मात्र असे असतानाही याबाबत संस्थाचालक अनभिज्ञ कसे असू शकतात असा सवाल सभासदांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रथमदर्शनी या अपहार प्रकरणात लेखापाल एकटाच दिसत असला तरी या प्रकरणात संस्थेंतर्गत रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असून गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

संस्थेच्या वतीने करण्यात येणारा ऑडिट रिपोर्ट आलेला असून तो पूर्णपणे शासकीय स्तरावरील ऑडिट रिपोर्ट येण्यास अजून चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर सर्व गोष्टी स्पष्टपणे होतील व त्यानंतर बँकेच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल. : प्रशांत शेळके, मानद सचिव, सिद्धीविनायक पतसंस्था, ओझर

पतसंस्थेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. सहाय्यक निबंधक यांच्याशी पत्र व्यवहार केला असून त्यांच्या मार्फत लेखापरीक्षण सुरू आहे त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. : अशोक रहाटे, पोलीस निरीक्षक, ओझर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -