घरमहाराष्ट्रनाशिकबेपर्वाई भोवली! आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील वॉर्डन निलंबित

बेपर्वाई भोवली! आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील वॉर्डन निलंबित

Subscribe

आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांना प्रत्यक्ष पाहणीत वसतीगृहाच्या खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, तुटलेले दरवाजे आढळले

आदिवासी आश्रमशाळेत शिकणार्‍या आणि वस्तीगृहात राहणार्‍या मुलींच्या सुरक्षेतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सुतोवाच बुधवारी (दि.३) आढावा बैठकीत आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी केले होते. या बैठकीनंतर त्यांनी नाशिकच्या पेठरोड येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहाची पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना वसतीगृहाच्या खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, तुटलेले दरवाजे आढळले. त्यामुळे उईके यांनी जागेवरच वसतीगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन केले.

आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी काल (दि.3) नाशिक येथे या खात्याच्या सर्व अधिकार्‍यांसह आढावा बैठक घेतली होती. बैठक झाल्यानंतर त्यांनी रात्री 9 वाजेच्या दरम्यान पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य इंग्रजी माध्यम शाळा, मुलांचे वसतीगृह मुलींचे वसतीगृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना मुलींच्या वसतीगृहातील सुविधांमध्ये त्रुटी आढळली. त्याचबरोबर मुलींच्या वसतीगृहाचे दरवाजे आणि खिडक्या तुटलेल्या आढळल्या. दुरुस्ती का झाली नाही, याची माहिती त्यांनी संबंधित महिला वॉर्डनला विचारली. त्यावेळी त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्या महिला वॉर्डनचे जागीच निलंबन करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळा, वसतीगृहांचे सुशोभिकरण, दुरुस्तीवर भर दिलेला असताना आहे, असे असतानाही यात कुचराई केली जात असेल, तर असे अधिकारी, कर्मचारी कारवाईला पात्र आहेत, अशा शब्दात से उईके यांनी अधिकारी- कर्मचार्‍यांचे कान उपटले. दरम्यान त्यांनी मुलींच्या समस्याही जाणून घेतल्या.

- Advertisement -

पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाचे वसतीगृह मुख्य रस्त्यालगत असल्याने तेथे बाहेरून येणार्‍या मुलांकडून आदिवासी मुलींच्या छेड काढण्याच्या प्रकारात तक्रारी पूर्वी करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे येथे मुलींच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याची गरज वसतीगृहांच्या अधीक्षिकेची जबाबदारी अधिक होती. मात्र, असे असतानाही वसतीगृहात दरवाजे, खिडक्या तुटलेल्या फर्निचरची दुरवस्था झालेली आढल्याने ही तडकाफडकी कारवाई झाली. या जागी तत्काळ जळगाव येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहांच्या अधीक्षिकेची वॉर्डन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आढावा बैठकीत मंत्री उईके यांनी अधिकार्‍यांना कामात कुचराई , योजना अंमलबजावणीत अपहार केल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या तर थेट निलंबन करण्याचा इशारा दिला. रात्री उशीरा मुलींच्या वसतीगृहाच्या महिला वॉर्डनचे निलंबन झाल्याने आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांत धडकी भरली होती.

निलंबित वॉर्डन तेथेच गृहपाल!

आदिवासी विकास मंत्र्यांनी निलंबित केलेल्या महिला वॉर्डनला त्याच मुलींच्या वसतीगृहात गृहपाल म्हणून बदली करण्यात आल्याने, ही कारवाई केवळ देखावा होता का, असा सवाल आदिवासी संघटना, विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान आदिवासी विकास भवनमध्ये नवीन वॉर्डन आणि निलंबित वॉर्डन यांची पदभारासाठी धावपळ सुरू होती. वसतीगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याला मंजुरी, प्रत्यक्ष काम देण्याच्या प्रक्रियेला थोडा विलंब झाल्याचे या विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -