घरमहाराष्ट्रनाशिकदुष्काळाने कट्टर वैरी आणले एकाच विहिरीवर

दुष्काळाने कट्टर वैरी आणले एकाच विहिरीवर

Subscribe

एकमेकांचे तोंड न बघणारे आता भरतात एकाच ठिकाणी पाणी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काकडपाना गावासाठी एका स्वयंसेवी संस्थेने पाईपलाईन करून देण्याचे आश्वासन दिले. गावकर्‍यांनी फक्त आपल्या शेतातून ही पाईपलाईन जाऊ देण्यास विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वर्षभरापासून धुळखात पडला आहे. आपसातील वादातून पाईपलाईन रखडली, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावकर्‍यांना इतका रडवतो आहे की, त्यांना टँकरने पाणी भरण्यासाठी एकाच विहीरवर यावे लागत आहे. पाईपलाईन टाकण्यावरून झालेल्या वादानंतर एकमेकांचे तोंड न बघणारे हेच लोक आता पाणी भरण्यासाठी एकाच विहिरीवर धाव घेताहेत.

दमणगंगा नदीच्या काठावर वसलेले काकडपाना हे १६५० लोकवस्तीचे गाव आहे. गावाच्या सुरुवातीला एक वाडी आहे. काकडपाना आणि वाडीच्या लोकांमध्ये इतके टोकाचे मतभेद आहेत की दोन्ही गावांना दोन वेगवेगळे टँकर द्यावे लागतात. एका गावातील पाणी दुसर्‍या गावाला दिलेले चालत नाही. नाहीतर गावकरी टँकरचालकास धारेवर धरतात. गावकर्‍यांच्या आपसातील मतभेदामुळे सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेने मंजूर केलेली पाईपाईनची योजना रखडली आहे. दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याचा संपूर्ण खर्च ही संस्था करणार आहे. त्यासाठी गावकर्‍यांना फक्त आपल्या शेतजमिनीतून पाईपलाईन टाकण्याची परवानगी द्यायची आहे. मात्र, आपल्या शेतातून नाही तर शेजारच्या शेतातून टाका, असे म्हणत बहुतेकांनी या योजनेला विरोध केला. पावसाळ्यात सुरू झालेले काम अखेर बंद करुन संस्थेला आपले बस्तान गुंडाळण्यास येथील रहिवाशांनी भाग पाडले. जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे गावाची हद्दच वाटली गेली. एकमेकांच्या सुख, दु:खात सहभागी न होण्यापर्यंत हा विषय पोहोचला. विकोपाला गेलेले भांडणाची धुसपूस सुरू असताना दुष्काळाने डोके वर काढले. गावात आता पिण्यासाठी पाणी मिळत नाही.

- Advertisement -

सोळाशे लोकांना दिवसभरात एकच टँकर पाणी मिळते. तेही विहीरीतून ओढून काढावे लागते. पाणी घेण्यासाठी गावापासून अर्धा किलो मीटरवर असलेल्या सार्वजनिक विहिरीवर आता सर्वांनाच पाणी भरण्यासाठी एकत्र यावे लागते. अंतर्गत भांडणामुळे आपल्या सर्वांची ही परवड होत असल्याचे दुष्काळाने त्यांना जाणीव करून दिली. आतातरी पाणी पुरवठा योजना पूर्ण करा, अशी दबक्या आवाजातील चर्चा गावात सुरू झाली आहे. एकमेकांशी भांडणारे लोक अजूनही एकत्र येण्यास तयार होत नसले तरी, काही लोकांनी आपला हट्टीपणा सोडून स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधत आम्ही तयार असल्याचे सांगितले आहे. काहीही करा, पण आमच्या गावात पाणी पोहोचवा, असे साकडे घातल्याने आतातरी गावकरी आपल्या मुला- बाळांचा विचार करून हो म्हणतील, अशी अपेक्षा येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

मानसिकतेचा दुष्काळ

स्वयंसेवी संस्था स्वत: पुढाकार घेऊन गावासाठी पाणी देऊ करत असेल तर गावकर्‍यांचे हे भाग्यच म्हटले पाहिजे. पण ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ अशीच म्हणण्याची वेळ काकडपाना गावकर्‍यांवर आली आहे. वर्षापूर्वी सोशल नेटवर्कींग फोरम या संस्थेने पाईपलाईन देण्याचे ठरवले, पण गावकर्‍यांनी जमीन न दिल्यामुळे त्यांच्या घरापर्यंत पाणी येऊ शकले नाही. अन्यथा एकमेकांचे तोंड न बघणार्‍यांवर आज एकाच विहिरीवर पाणी भरण्याची वेळ आली नसती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -