जिल्हा परिषद अध्यक्षांकडून विभागांची झाडाझडती

जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.4) दुपारी कार्यालयांमध्ये अचानक भेट देवून झाडाझडती घेतली. पशुसंवर्धन विभागाजवळील गोडावूनमध्ये शिपाई कर्मचार्‍यांचे तब्बल 410 वूलन स्वेटर धूळखात पडून आहेत. याची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

जिल्हा परिषदेचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असताना कामकाजात अपेक्षित गती प्राप्त होत नसल्याचे दिसते. अध्यक्ष क्षीरसागर यांनी मंगळवारी प्रत्येक विभागात अचानकपणे भेट देवून कर्मचार्‍यांचे हालचाल रजिस्टर तपासले. यात एकूण 21 कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच जिल्ह्यातील 1100 कर्मचार्‍यांसाठी दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेले 410 वूलन स्वेटर (ब्लँकेट) अर्थ विभागाच्या भंडारात पडून असल्याचे निदर्शनास आले. याची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा केला असल्याचे काही कर्मचार्‍यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागणी नसताना खरेदी का केली? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत अध्यक्षांनी सामान्य प्रशासन विभागाला धारेवर धरले. आरोग्य विभागास भेट दिली असता येथील कर्मचार्‍यांना अनपेक्षित धक्का बसला. अध्यक्ष बराच वेळ उभे राहिल्यानंतर काही कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आल्याने त्यांची भंबेरी उडाली. येथील सात कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. प्राथमिक शिक्षण भागातील दोन कर्मचारी गायब असल्याचे दिसते. ग्राम पंचायत विभागातील एक कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळले. त्याचप्रमाणे लघु पाटबंधारे (पश्चिम) 2, बांधकाम एकचे 4, समाजकल्याणचे 2, बांधकाम तीनचे-3 असे एकूण 21 कर्मचारी पसार असल्याचे अध्यक्षांच्या पाहणीतून स्पष्ट झाले. या कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.