Navneet Rana : राणा दाम्पत्याचे मुंबईतील घराचे बांधकाम अनधिकृतच, बीएमसीने पुन्हा बजावली नोटीस

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा  (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मुंबईतील (Mumbai) खार येथील घराचे बांधकाम अनधिकृत असल्यामुळे मुंबई मनपाने (BMC) राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. शिवसेनेसोबत (Shivsena) वाद सुरू असतानाच आता बीएमसीकडून राणा दाम्पत्याला अनधिकृत बांधकाम प्रकरणात नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे.

मुंबईतील खार परिसरात राणा दाम्पत्याचे घर आहे. या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप याआधीही करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई मनपाने राणा दाम्पत्याच्या घराची पाहणी सुद्धा केली होती. मात्र, राणा दाम्पत्याने मुंबई मनपाला आपली बाजू मांडत उत्तर दिलं. परंतु त्यांनी दिलेलं उत्तर अमान्य असल्याचं बीएमसीने म्हटलं आहे. घरात करण्यात आलेल्या बांधकामात नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. हे अनधिकृत बांधकाम ७ ते १५ दिवसांमध्ये पाडावं नाही तर महापालिका यावर कारवाई करेल, असं मुंबई मनपाकडून सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्यांच्या मुंबईतील खार येथील घरात अनधिकृत बांधकाम केल्याची नोटीस पालिकने दिली होती. राणा दाम्पत्य तुरुंगात असताना पालिकेने त्यांच्या दारावर ही नोटीस लावली होती. ३५३ अंतर्गत तोडक कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस पालिकेकडून राणा दाम्पत्याला बजावण्यात आली होती. राणा दाम्पत्य राहत असलेल्या सोसायटीच्या पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांचे नावे नोटीस पाठवण्यात आली होती.

या नोटीसवर राणा दाम्पत्यांकडून उत्तर देण्यात आलं. मात्र, हे उत्तर असमाधानकारक असल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. परंतु दुसऱ्यांदा नोटीस पाठवल्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, राणा दाम्पत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

काय आहे प्रकरण?

दरम्यान, राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री या बंगल्यावर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून ते बारा दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र, न्यायालयाने त्यांना मीडियाशी बोलू नये, अशी अट घातली होती. परंतु ही अट त्यांनी न पाळल्यामुळे राज्य सरकारने राणा दाम्पत्याचा जमीन रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर राणांना नोटीस पाठवून यावर त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा : DC vs MI Match IPL : जर आमचा पराभव झाला तर.., सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचं मोठं विधान