घरमहाराष्ट्रNavneet Rana : उमेदवारीसाठी स्वतःच्याच पक्षाचा राजीनामा देत नवनीत राणा भाजपात

Navneet Rana : उमेदवारीसाठी स्वतःच्याच पक्षाचा राजीनामा देत नवनीत राणा भाजपात

Subscribe

भाजपाकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी स्वतःच्या पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला.

नागपूर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून सस्पेन्स असलेल्या अमरावती लोकसभेतून भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल बुधवारी (ता. 27 मार्च) भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये खासदार नवनीत राणा यांची घोषणा केली आहे. राणा यांना अमरावती लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 2019 च्या लोकसभेत अपक्ष निवडणूक लढलेल्या नवनीत राणा 2024 च्या लोकसभेत मात्र भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. यासाठी काल रात्री उशिरा नवनीत राणा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. (Navneet Rana resigned from his own party for BJP candidacy)

हेही वाचा… Navneet Rana : लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, नवनीत राणांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे मानले आभार

- Advertisement -

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “मोदीजींच्या विचारावर मी मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. मला अमरावती मतदारसंघातून उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार.” असे राणा यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, भाजपात मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. विरोधी पक्षात असताना 33 महिने लढा दिला, आमची विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही. भाजपाच्या 400 पारच्या संकल्पात अमरावतीची खासदार म्हणून मी एक असेल, असेही नवनीत राणांनी यावेळी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे राणांनी काल स्वतःच्याच पक्षाचा राजीनामा दिला आहे. पती आणि युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांना पत्र लिहित नवनीत राणा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

- Advertisement -

नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आणि त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचा पक्ष प्रवेश भाजपा संघटनेला मजबुती प्रदान करणारा असेल. नवनीत राणा या अमरावती नव्हे तर विदर्भ व महाराष्ट्राच्या नेत्या असतील.

नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात अल्याने महायुतीत मात्र, वादाची ठिणगी पडली आहे. कारण राणा यांच्या उमेदवारीला महायुतीत शिवसेना आणि प्रहार संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. त्याशिवाय अमरावतीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनीच राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. परंतु, कोणाच्याही विरोधाला न जुमानता भाजपाने राणा यांच्या नावाची घोषणा केल्याने शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू व भाजपाचे पदाधिकारी संतापले आहेत. तर, राणा यांना नेमकी कोणाच्या जीवावर उमेदवारी देण्यात आली, असा प्रश्न अडसूळ यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -