मलिकांची मुलगी निलोफर आता मैदानात; समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची पत्रिका केली शेअर

Nawab Malik's daughter Nilofar Khan Malik shared Sameer Wankhede's marriage invitation card
मलिकांची मुलगी निलोफर आता मैदानात; समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची पत्रिका केली शेअर

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मुलगी आता मैदानात उतरली आहे. निलोफर मलिक यांनी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका ट्विट करत शेअर केली आहे. ज्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असं लिहिलेलं आहे.

निलोफर मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची म्हणजे डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी झालेल्या विवाहाची लग्न पत्रिका शेअर केली आहे. ज्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असं लिहिलेलं आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना मलिक शेख यांनी देखील विवाह दाखल शेअर केला. ज्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षिदार असल्याचं दिसतंय.

क्रांती रेडकरने केलं ब्लॉक

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांना ट्विटरवर ब्लॉक केलं आहे, असा दावा सना मलिक शेख यांनीच केला आहे. त्यांनी त्याबबतचा स्क्रीनशॉट शेअर करत जेव्हा तुम्ही सत्याला समोरे जाऊ शकत नाही…, असं म्हटलं आहे.

आर्यन खान प्रकरण फर्जीवाडा – नवाब मलिक

आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाडयावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेईल. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे अशी उधळपट्टी थांबली पाहिजे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आलीय केंद्रसरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे आणि आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.