घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा विश्वासू अधिकारी भाजपच्या लोकांना झेपत नाही - छगन भुजबळ

मुख्यमंत्र्यांचा विश्वासू अधिकारी भाजपच्या लोकांना झेपत नाही – छगन भुजबळ

Subscribe

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपल्या होम ग्राऊंडवर पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरोधात मोर्चा काढून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना हात घातला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हा दत्तक घेतलेला आहे. त्यामुळे नाशिक शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी विश्वासातले आयुक्त पाठविले. मात्र नाशिकचा विकास करण्याऐवजी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम आयुक्तांकडून होत आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हुकुमशाही पद्धतीने कामकाज करून नये, महापौर कोणत्याही पक्षाचा असो त्यांचा सन्मान करायला हवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना दिला आहे. तसेच भाजपच्या लोकांचा पाठीचा कणा इतका लेचापेचा कसा? असा सवाल करत भाजपच्या लोकांना एक अधिकारी झेपत नाही का? असा चिमटा त्यांनी काढला. नाशिककरांवर लादलेली करवाढ सरसकट रद्द करण्यासह विविध प्रश्नांसंदर्भात नाशिक महानगरपालिकेवर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

मी दोन वेळा मुंबईचा महापौर आणि वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम बघितले आहे. जनतेच्या प्रश्नांची मला चांगली जान असून अधिकारी नगरसेवक आणि जनतेला विश्वासात घेऊन विकासाची कामे करु शकतात. मात्र विकास करत असतांना उद्योगधंदे बंद पाडून, घरे पाडून आणि करवाढ करून नाशिककरांच्या डोळ्यात अश्रू येणार असतील तर असा विकास आम्हाला नको, असा इशाराच भुजबळ यांनी आयुक्त मुंडे यांना दिला.

- Advertisement -

दारूच्या दुकानापेक्षा नर्सिंग होमला कर अधिक

महानगरपालिकेकडून घरपट्टी, मोकळ्या जागा, शेतजमिनी, औद्योगिक भूखंड, नर्सिंग होम यांच्यावर भरमसाठ करवाढ लादली आहे. दारूच्या दुकानापेक्षा नर्सिंग होमसाठी जास्त कर, हा कोणत्या न्याय ? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच एकीकडे पेट्रोल डीझेलवरील करवाढ आणि महागाईसारख्या अनेक प्रश्नांचा नागरिक सामना करत असताना महापालिकेकडून झालेल्या करवाढीमुळे आयुक्तांनी नाशिकला डबल त्रास दिला आहे. तसेच अंगणवाड्या बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तुकाराम मुंडेंना भाजपच्या लोकप्रतिनिधींचा विरोध

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे हे वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना अनेक वाद झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी केली होती. तिथेही भाजपच्या नगरसेवक आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या दबावामुळे मुंडेंची बदली पुणे परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी करण्यात आली. मात्र तिथेही भाजपच्याच लोकप्रतिनिधींशी पटले नसल्यामुळे पुन्हा त्यांची बदली नाशिक मनपाच्या आयुक्तपदी करण्यात आली. नाशिक मनपात भाजपची सत्ता आहे. मात्र तरिही पुन्हा एकदा भाजपकडूनच मुंडे यांना विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -