इंदुरीकर महाराजांच्या लस न घेणाच्या वक्तव्यावर, राजेश टोपे म्हणतात

NCP Leader rajesh tope speak on indurikar maharaj corona vaccination statement
इंदुरीकर महाराजांच्या लस न घेणाच्या वक्तव्यावर, राजेश टोपे म्हणतात

राज्यातील लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोनाविरोधी लसी घेणार नाही असं वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. यातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्यावर प्रतिक्रिया देत त्यांची समजूत काढणार असल्याचे म्हटले आहे. बारामतीत मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी राजेश टोपे म्हणाले की, इंदुरीकर महाराज त्यांच्या स्टाईलने समाज प्रबोधन आणि जनजागृती करतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्जी जमते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधनपर कार्यक्रम बंद होते. यामुळे समाजातील लोकांशी त्यांचा जास्त संपर्क आला नाही. यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी. जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व पटले आहे. मात्र महाराजांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. यामुळे वैज्ञानिक बाजूने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यात आत्तापर्यंत ७ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तर ३ कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. महाराष्ट्राच्या टार्गेटमधील ७३ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण झाला आहे. मात्र जर केंद्र आणि राज्याच्या आकडेवारीमध्ये फरक जाणवत असला तरी जुळवणी करण्याचे काम सुरु असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

इंदुरीकर महाराज काय म्हणाले?

नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान इंदुरीकर महाराज म्हणाले की, प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वेगळी असते हे यांना कळायला नको का? प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी असते. मी महाराष्ट्रभर फिरतो पण मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे. मात्र या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.