घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटीलच शिवसेनेत गेले नाहीत म्हणजे मिळवलं - रोहित पवार

चंद्रकांत पाटीलच शिवसेनेत गेले नाहीत म्हणजे मिळवलं – रोहित पवार

Subscribe

शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधली २५ वर्षांची युती तुटली आणि राज्याच्या राजकारणार महाविकासआघाडी नावाचा नवा प्रयोग अस्तित्वात आला. गेल्या ८ महिन्यांपासून हा प्रयोग राज्यात अस्तित्वात असला, तरी त्यामध्ये अपेक्षेप्रमाणेच कुरबुरी सुरूच आहेत. ही संधी भाजपनेही साधत सातत्याने या तीन पक्षांमधल्या मतभेदांना हवा देणं आणि शिवसेनेला युतीसाठी चुचकारणं सुरूच ठेवलं आहे. त्यातच, चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच शिवसेनेसोबत जायला तयार आहोत, पण निवडणुका स्वतंत्रच लढवू, असं विधान करून राज्याच्या राजकारणात पुन्हा हालचाल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांच्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी खोडून काढत उत्तर दिलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले रोहीत पवार?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर रोहीत पवारांनी त्यांच्या याच मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. ‘आजही शिवसेनेसोबत जाण्यासाठी तयार असल्याचं भाजपमधील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षांत भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकासआघाडीत घ्या, असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आता तरी राजकारण थांबवा’, असं ट्वीट रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे.

- Advertisement -

महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यामुळे खुद्द देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर अशी भाजपची दिग्गज मंडळी राज्यामध्ये भाजपचा (BJP) विरोधाचा सूर तीव्र करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या टिकेला महाविकासआघाडीकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य खोडून काढत देवेंद्र फडणवीस यांनी ‘ना शिवसेनेकडून (Shivsena) आम्हाला कोणता प्रस्ताव आला, ना आम्ही त्यांना कोणता प्रस्ताव दिला. चंद्रकांत पाटलांचं विधान एका प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. पण आम्ही पुढच्या निवडणुका स्वबळावरच लढवणार आहोत’, असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे भाजपच्या विरोधाची आघाडी सांभाळणाऱ्या नेतेमंडळींची पंचाईत झाल्याचं मात्र दिसून आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -