सीमाप्रश्नी आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही, शिंदेंनी बोम्मईंना फोन केल्यानंतर केले ट्विट

दोन्ही राज्यात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, यावर आम्हा दोघांचेही एकमत झाल्याचंही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे

eknath shinde
eknath shinde

नवी दिल्लीः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात सीमावादासंदर्भात फोनवरून चर्चा झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, दोन्ही राज्यात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, यावर आम्हा दोघांचेही एकमत झाल्याचंही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. परंतु कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच त्याबद्दल कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जाईल, असंही बसवराज बोम्मई यांनी सांगितलं. विशेष म्हणजे ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नसल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच हा संपूर्ण विषय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या कानावरही घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. परंतु आता रात्री ११ वाजताच्या दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपण हटवादी भूमिका सोडली नसल्याचंही ट्विट करत स्पष्ट केलंय.


बेळगाव सीमाभागातील प्रश्नाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असून, दोन्ही राज्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रश्नावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली होती.

बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या धुडगुसानंतर राज्य सरकारने यावर पावले उचलायला सुरुवात केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आदी उपस्थित होते. त्यानंतर उदय सामंतांनी महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. या बैठकीत एकूणच सर्व प्रकारावर चर्चा करण्यात आलीय. मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधलाय.

हल्ला प्रकरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली आणि कारवाईची मागणी केली आहे. हल्ल्याप्रकरणी जे जबाबदार आहेत, त्यांच्यापैकी काहींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच उर्वरित जणांवरही कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी बोम्मई यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. याशिवाय दोन्ही राज्यांतील जनतेला या प्रकरणाचा त्रास होऊ नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. लवकरच या प्रश्नी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले होते.


हेही वाचाः कुडाळमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून मनसे आक्रमक, एसटी बस रंगवत केलं आंदोलन