घरताज्या घडामोडीपुण्यात २४ तासांत एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही, विभागीय आयुक्तांची माहिती

पुण्यात २४ तासांत एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही, विभागीय आयुक्तांची माहिती

Subscribe

पुण्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासोबतच, प्रशासनाकडून काय उपाययोजना घेतल्या जात आहेत, त्याची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.

राज्यात करोनाबाधितांची संख्या आता २० पर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांची पूर्णपणे अंमलबजावणी पुण्यात सुरू असल्याची माहिती पुणे विभागाचे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुण्यातल्या करोनाबाधित रुग्ण, संशयित रुग्ण आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. ‘कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नसेल, तर त्या बाबतीत जिल्हाधिकारी स्वतंत्रपणे आदेश देऊ शकतात. या आदेशांचं पालन करणं प्रत्येकावर बंधनकारक असेल. पालन न केल्यास भादंवि १८८ कलमानुसार ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पूर्ण राज्यामध्ये याची कठोर अंमलबजावणी केली जाईल’, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

मुलांनी खेळताना ६ फूट अंतर ठेवावं!

दरम्यान, शाळा-महाविद्यालयांबाबतचे निर्णय यावेळी आयुक्तांनी सांगितले. ‘राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयं, जिम, पोहण्याचे तलाव, नाट्यगृह आणि थिएटर या गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी काल रात्री १२ नंतर आपण सुरू केली. हे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’, असं ते म्हणाले. ‘पालकांना विनंती आहे की शाळांना सुट्ट्या दिल्या म्हणजे त्यांनी शहरात फिरायचं नाही. स्वत:ला घरातच ठेवायचं आहे. बागेत खेळताना देखील ६ फूट अंतर ठेवायला हवं’, असं देखील त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी बाहेर फिरू नये

‘राज्य सरकारच्या निर्णयानुसार १०वी, १२वी आणि विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही निर्णय झालेला नाही. ज्यांच्या परीक्षा नाहीत, ते विद्यार्थी वसतिगृहात किंवा घरातच राहतील. ते अनावश्यक बाहेर पडणार नाहीत. वसतिगृह रिकामे करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्याची घरी जायची इच्छा असेल, तर त्याला जाऊ द्यावं’, असं ते म्हणाले.

शुक्रवारी रात्री ११२ प्रवासी पुण्यात उतरले

‘काल रात्री दोन विमानं आली. एअरइंडियाच्या विमानातून ३० प्रवासी आले तर स्पाईसजेटमध्ये ८२ प्रवासी होते. या सगळ्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आपण घेत आहोत. या ११२ जणांपैकी कुणीही बाधित ७ देशांमध्ये गेलेले नाहीत हे त्यांनी सेल्फ डिक्लरेशन दिलं आहे. आम्ही इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून देखील त्याची खात्री केली आहे. या ११२ पैकी एकाने स्वत:ला लक्षणं दिसत असल्याचं सांगितल्यामुळे त्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे’, अशी माहिती म्हैसेकर यांनी दिली.

- Advertisement -

‘केंद्र सरकारच्या नियमांनुसार संशयित रुग्णांना २८ दिवस निगराणीखाली ठेवलं जाईल. पहिले १४ दिवस अॅक्टिव्ह सर्वेलन्स आणि पुढचे १४ दिवस पॅसिव सर्वेलन्सवर ठेवलं जाईल’, असं देखील ते म्हणाले.


हेही वाचा – करोना: ३१ मार्चपर्यंत रेल्वे हेरिटेज म्युझियम बंद राहणार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -